काबुल (अफगाणिस्तान) – वीस वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या सैनिकांनी माघार घेतल्याने संपूर्ण अफगाणिस्तानावर तालिबानचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. अफगाणिस्तानात राष्ट्रपती भवनावर तालिबानने कब्जा केला आहे. अल-जझिरा न्यूज टेवर्कवर प्रसारित व्हिडिओ फुटेजनुसार, तालिबानच्या कट्टर बंडखोरांचा एक समूह राजधानी काबुलमधील राष्ट्रपती भवनाच्या आत घुसले आहे. अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालबिनाकडून अफगाणिस्तानचे “इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान” असे नामकरण करण्याची शक्यता आहे.
संयुक्त राष्ट्रांची आपत्कालीन बैठक
अॅस्टोनिया आणि नॉर्वेच्या मागणीनंतर सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (यूएनएससी) आपत्कालीन बैठक होणार आहे. संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनिओ गुतारेस परिषदेच्या सदस्यांना काबुलवर तालिबानच्या कब्जानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती देणार आहेत.
अमेरिकेकडून कर्मचार्यांची सुटका
काबुलवर तालिबान्यांनी कब्जा करण्यापूर्वीच राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देशातून पलयान केले आहे. देशातील नागरिक आणि परदेशी नागरिकही युद्धग्रस्त अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु काबूलमधून हवाई वाहतूक सेवा बंद असल्याने लोकांच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेकडून काबूलमधील दुतावासातून उर्वरित कर्मचार्यांना बाहेर काढले जात आहे, असे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सांगितले.
लोकांना क्रूर शासनाची भीती
तालिबानने क्रूर शासन लागू केल्यास पुन्हा अत्याचार सुरू होऊन महिलांचे अधिकार संपणार असल्याची भीती अफगाणिस्तानातील नागरिकांना सतावत आहे. आयुष्यभराची रक्कम काढण्यासाठी लोक एटीएमच्या बाहेर रांगा लावून उभे आहेत. काबुलमध्ये अधिक सुरक्षित वातावरण असल्याच्या शक्यतेने ग्रामीण भागातून आलेल्या हजारो नागरिकांनी शहरातील उद्याने आणि मोकळ्या जागांमध्ये आश्रय घेतला आहे. राष्ट्रपती अशरफ गनी देश सोडून निघून गेल्याच्या वृत्ताला अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला यांनी दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तामध्ये गेल्या दोन दशकापासून सुरक्षा दलांना तयार करण्यासाठी अमेरिका आणि नाटोकडून अब्जावधी डॉलर खर्च करूनही तालिबानने आश्चर्यकारकरित्या एका आठवड्यातच संपूर्ण अफगाणिस्तानावर कब्जा केला आहे. काबूलवर महिनाभरातच तालिबान पुन्हा कब्जा करू शकते, असा अंदाज अमेरिकेच्या लष्कराने काही दिवसांपूर्वी लावला होता.