काबुल : अफगाणिस्तान मध्ये तालिबानी राजवटीच्या दहशतवादी वर्चस्वानंतर अनेक देशांनी याबाबत निषेध व्यक्त केला असतानाच पाकिस्तानने मात्र तालिबानी राजवटीत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तालिबानी सरकारने पाकिस्तानला एक प्रकारे झिडकारले आहे. कारण दोन देशांच्या चलनाची देवाणघेवाण करण्याची व्यवस्था केली जाऊ शकते, असा एका उच्चपदस्थ पाकिस्तानी मंत्र्याने केलेला दावा तालिबानने फेटाळला आहे. अफगाणीस्तान मधील नव्या तालीबानी सरकारने पाकिस्तानी रुपयामध्ये व्यवसाय करण्यास नकार दिला आहे. अफगाण सरकारचे शेजारील देशांमधील व्यवहार “अफगाणी” चलनात असतील, असे तालीबानने जाहीर केले आहे. पाकिस्तान लवकरच अफगाणिस्तानसोबत पाक चलन रुपया मध्ये व्यापार सुरू करेल, मात्र असे सांगण्यात आल्यानंतर लगेचच तालीबानने हे विरोधी निवेदन जारी करण्यात आले. यामुळे त्यांची सध्याची आर्थिक तूट कमी होईल.
दरम्यान, बँक ऑफ अफगाणिस्तानची मालमत्ता जप्त करण्याची अमेरिकेत चर्चा होती. तसेच जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर अफगाणिस्तानला निधी थांबवण्याचा इशारा दिला. त्यामुळे अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार आर्थिक अडचणीत असताना पाकिस्तानने याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झालेल्या दिसत नाही. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सने काबूलला आपली व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. पीआयएचे सीईओ अर्शद मलिक यांनी सांगितले की, पीआयएचे पहिले विमान इस्लामाबादहून काबूलसाठी रवाना होईल. यासाठी अफगाणिस्तानच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने आधीच मान्यता दिली आहे.