विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानने मागील माहिन्यात १५ ऑगस्ट रोजी काबूल शहर ताब्यात घेतल्यानंतर आता जवळपास २१ दिवसांनी मंगळवार ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी अंतरिम सरकार स्थापनेची घोषणा केली. यामध्ये तालीबान गटातील जुन्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले असून नव्या सरकारमध्ये ३३ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मुल्ला मोहम्मद हसन अखुंद यांच्याकडे अफगाणिस्तानचे पंतप्रधान पद देण्यात आले आहे. मुल्ला बरादार आणि मौलवी हनाफी यांना उपपंतप्रधान सोपविण्यात आले आहे. तालिबानचे प्रमुख शेख हिबदुल्ला अखुंदजादा सर्वोच्च नेते असतील. विशेष म्हणजे तालिबानच्या मंत्रिमंडळातही अमेरिकेचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेल्यांना देखील स्थान देण्यात आले आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्य आणि पूर्वीच्या अफगाणिस्तान सरकारच्याविरुद्ध गेल्या २० वर्षांच्या युद्धात वर्चस्व गाजवणाऱ्या तालिबानमधील प्रमुख व्यक्तींचा विद्यमान सरकारमध्ये समावेश आहे. पूर्वीच्या कराराअंतर्गत अमेरिकेने अफगाणिस्तानमधून आपले सैन्य पूर्णपणे बाहेर काढले. त्यानंतर आता देशात नवीन सरकारची स्थापना झाली असून हक्कानी नेटवर्कचे सिराज हक्कानी यांना गृह मंत्रालयही देण्यात आले आहे. विशेष म्हणजे सिराज हक्कानी हा अमेरिकेचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे.
याशिवाय मुल्ला याकूबला संरक्षणमंत्री बनवण्यात आले आहे. खैरुल्ला खैरखवा यांना माहिती मंत्रीपद देण्यात आले आहे. अब्दुल हकीम यांना न्याय मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. तर शेर अब्बास स्टेनिकझाई यांची उपपरराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर जबीहुल्ला मुजाहिद यांना माहिती विभाग मंत्रालयातील उपमंत्रिपदाची कमांड देण्यात आली आहे.
आता संपूर्ण मंत्रिमंडळातील काही मंत्री यांचा थोडक्यात परिचय आणि माहिती जाणून घेऊ या…
पंतप्रधान: मुल्ला हसन अखुंद यांचे तालिबानचे सुरुवातीचे ठिकाण कंधार असून ते या सशस्त्र चळवळीच्या संस्थापकांपैकी एक आहे. त्यांनी २० वर्षे ‘रहबारी शूरा’चे प्रमुख म्हणून काम केले आणि ते मुल्ला हेबतुल्लाह अखुंदजादा यांचे निकटवर्तीय मानले जातात. १९९६ ते २००१ पर्यंत अफगाणिस्तानमधील मागील तालिबान सरकारच्या काळात त्यांनी परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून काम केले.
उपपंतप्रधान: मुल्ला बरादर हे तालिबानच्या संस्थापकांपैकी एक आहेत. १९९४ मध्ये तालिबानच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग होता. तालिबानने १९९६ ते २००१ पर्यंत अफगाणिस्तानवर राज्य केले तेव्हा मुल्ला बरदार यांनी महत्वाची भूमिका बजावली.
गृहमंत्री – सिराजुद्दीन हक्कानी हे हक्कानी नेटवर्कचे प्रमुख असून सोव्हिएतविरोधी लढाईचे प्रमुख जलालुद्दीन हक्कानी यांचे पुत्र आहे. सिराजुद्दीन हक्कानी यांना गृहमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. हक्कानीचे नाव जागतिक स्तरावरील दहशतवाद्यांच्या यादीत आहे. अमेरिकेने त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास ५ दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे.
संरक्षण मंत्री – तालिबानचे संस्थापक मुल्ला मोहम्मद उमर यांचे पुत्र मुल्ला याकूब हे नवे संरक्षण मंत्री असतील. याकूब मुल्ला हे बतुल्लाचा युवा प्रमुख होता, यापूर्वी त्याला तालिबानच्या शक्तिशाली लष्करी आयोगाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले होते.
परराष्ट्र मंत्री: आमिर खान मुताकी यांनी मागील तालिबान सरकारमध्ये शिक्षण मंत्री तसेच संस्कृती आणि माहिती मंत्री म्हणून काम केले. त्यानंतर मुताक्कीला नंतर कतारला पाठवण्यात आले. शांतता आयोग आणि वाटाघाटी संघाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याने अमेरिकेशी बोलणी केली.