काबूल – अफगाणिस्तानातील पंजशीरमध्ये ताबा मिळविल्यानंतर त्यांच्या सत्तेला आव्हान देणा-या बंडखोरांना तालिबानने कठोर शब्दात इशारा दिला आहे. बंडखोरी करणा-याची गय केली जाणार नसून, त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला जाईल, असे तालिबानच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले, की पंजशीर भागात बंडखोरांचे नेतृत्व करणारे माजी राष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनीही देशातून ताजिकिस्तानला पलायन केले आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, सालेह गुप्त ठिकाणी असून, तेथूनच ते लढाईचे नेतृत्व करत आहेत. पंजशीरचे आणखी एक नेते अहमद मसूद ट्विट करून सांगतात, की अमरुल्लाह सालेह सुरक्षित असून, हे युद्ध सुरू ठेवण्यास तसेच तालिबानसमोर शरणागती पत्करणार नसल्याचे सांगत आहेत.
तालिबानच्या हल्ल्यानंतर बहुधा ते देश सोडून निघून गेले आहेत. परंतु सोशल मीडियावर सक्रिय राहणार्या सालेह यांनी आपले लोकेशन आणि पंजशीरच्या परिस्थितीबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. अफगाणिस्तानात सामान्य जनजीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न तालिबान करत आहे. त्याशिवाय अफगाणिस्तानमध्ये फसलेल्या लोकांना बाहेर जाण्यासाठी तसेच जगाशी संपर्क सुरू करण्यासाठी लवकरच काबूलमधून इतर देशात हवाई प्रवास सुरू केला जाणार आहे, असे तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले. सध्या अफगाणिस्तानात अंतरिम सरकारची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर बदल केले जाऊ शकतात. तालिबानच्या वेगवेगळ्या गटांमध्ये विभागांच्या वाटपावरून मतभेद आहेत. त्यामुळेच स्थायी सरकार स्थापन होण्याआधी अंतरिम सरकारचे गठण केले जाणार आहे.