काबूल – एकीकडे तालिबान भारताशी दोहा येथे चर्चा करत आहे, तर दुसरीकडे त्यांच्या प्रवक्त्याने काश्मीर मुद्दयावर वक्तव्ये सुरू केली आहेत. चीनमधील उइगर येथील मुस्लिमांवर होणा-या अत्याचाराकडे सोईस्कररित्या डोळेझाक करून जम्मू-काश्मीरसह जगातील मुस्लिमांसाठी आवज उठविण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे प्रवक्त्याने म्हटले आहे. तालिबान प्रवक्ता सुहेल शाहीनने हे वक्तव्य केले आहे. अलकायदाने काश्मीरप्रश्नी तालिबानला मदत मागितल्याचे वृत्त आल्याच्या एका दिवसानंतर तालिबानने हे वक्तव्य केले आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या तणावाच्या मुद्द्यावर तालिबान हस्तक्षेप करणार नाही. तसेच त्यांच्या भूमीचा वापर कोणत्याही देशाविरुद्ध होऊ देणार नाही, असे तालिबानच्या नेतृत्वाने आधीच स्पष्ट केले आहे.
बीबीसी ऊर्दूला दिलेल्या मुलाखतीत तालिबान प्रवक्ता सुहैल शाहीन म्हणाला, जम्मू-काश्मीरमधील मुस्लिमांसाठी आवाज उठविण्याचा तालिबानला अधिकार आहे. अमेकिकेसोबत दोहा येथे झालेल्या कराराचा उल्लेख करताना तो म्हणाला, की आम्ही कोणत्याही देशाविरुद्ध सशस्त्र मोहीम चालविणार नाही. भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकीच्या हत्येसंदर्भातील प्रश्नावर शाहीन म्हणाला, की कोणत्या परिस्थितीत त्यांची हत्या झाली याबाबत आम्हाला माहिती नाही. चकमकीदरम्यान दानिश यांचा मृत्यू झाला होता. दानिश यांच्या हत्येचा आरोप फेटाळून तो म्हणाला की, यासंदर्भातील सर्व माहिती आम्ही माध्यमांना लवकरच देणार आहोत. अफगाणिस्तानात घरोघरी जाऊन शत्रूंना शोधले जात आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात असल्याचे आरोपही शाहीनने फेटाळले आहेत. तालिबानकडे अशी कोणतीच यादी नाहीये, असा त्याने दावा केला.