विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
एकीकडे जगात शांतता नांदावी, यासाठी संयुक्त राष्ट्र सह काही शांतताप्रेमी देश प्रयत्न करत असताना काही असंतोषी देश आणि त्या देशांमधील दहशतवादी संघटना मात्र जगभरातील अनेक देशांमध्ये कायमच अशांतता आणि अराजकता राहावी, यासाठी शस्त्रास्त्रांचा निर्बंधपणे वापर करीत दहशत माजवत असतात. अलकायदा आणि तालिबान या सारख्या दहशतवादी संघटनांचे देखील असेच धोरण असल्याने जगभरातील अनेक देशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. विशेषत : गेल्या काही दिवसात अफगाणिस्तानमधील घडामोडींमुळे भारताला अधिक काळजी वाटत असून काश्मीर प्रश्नी आणखी डोकेदुखी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण अफगाणिस्तानतील विजयाबद्दल अल कायदाने तालिबानचे अभिनंदन केले आहे.
अफगाणीस्तानमधून बहुतांश अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर सत्तापिपासू तालिबानने अफगाणिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे या घटनेला काही तास उलटत नाही तोच अल-कायदाने तालिबानला अभिनंदनाचा संदेश पाठवला. त्यांच्या अभिनंदन संदेशाने भारताच्या चिंतेत भर पडली आहेत. कारण या अभिनंदनपर संदेशासह, अलकायदाने काश्मीर आणि अन्य अनेक ठिकाणांना इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करण्याची भाषा वापरली आहे. अल कायदा चा अरबी भाषेत अर्थ ‘द फाउंडेशन’, असा होतो. तसेच ही एक बहुराष्ट्रीय अतिरेकी सुन्नी इस्लामी संघटना असून ओसामा बिन लादेन, अब्दुल्ला आझम आणि त्यांच्या अन्य काही सहकाऱ्यांनी त्याची स्थापन केली. १९८० च्या दशकात अफगाणिस्तानवर सोव्हिएत आक्रमणाला या संघटनेने विरोध केला. त्यानंतर अल कायद्याच्या जगभरात दहशतवादी कारवाया वाढत गेल्या तर दुसरीकडे तालिबानी संघटनेचे शस्त्रास्त्र जमविण्याचे काम देखील सुरू होते.