जम्मू – अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी पुन्हा सक्रिय होऊन धोका वाढण्याची शक्यता आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ३८ दहशतवाद्यांनी तालिबान्यांकडून प्रशिक्षण घेतले आहे. अत्याधुनिक हत्यारे चालविण्यासह माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षित दहशतवादी एका आठवड्यापूर्वी पाकव्याप्त काश्मीरच्या (पीओके) हजिरामध्ये जैशच्या शिबिरात पोहोचले आहेत. पूंछ येथील चक्कां दा बाकच्या समोर हजिरा शिबिरात हालचाली गतिमान झाल्याची माहिती मिळाली आहे.
सीमेपलीकडून होणा-या दहशतवादी कारवायांमुळे पूंछ परिसर खूपच संवेदनशील आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हजिरा, कोटली, बागसह इतर भागात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. या जिल्ह्याच्या जवळील एलओसीवर २० हून अधिक लाँचिंग पॅड सक्रिय झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येक लाँचिंग पॅडवर १०-१२ दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. या लाँचिंग पॅडवर अनेक दहशतवादी असत. परंतु भारताकडून हवाई हल्ल्याच्या भीतीने आता दहशतवाद्याची संख्या कमी असते. पीओकेमध्ये जवानांच्या चौक्यांजवळही दहशतवाद्यांच्या हालचाली टिपल्या जात आहेत. भौगोलिक परिस्थितीमुळे पूंछचा एलओसीजवळचा भाग खूपच संवेदनशील आहे. गुलपूर, सलोत्री, चक्कां दा बाग आदी परिसरात घनदाट जंगलामधील मार्गाने घुसखोरी करणे सोपे जाते. २००२ च्या दरम्यान अफगाणी आणि सुडानी दहशतवाद्यांची पूंछ परिसरात उपस्थिती होती. तालिबानी धोक्याशी दोन हात करण्यासाठी सुरक्षा दल पूर्णपणे सक्षम आहेत. आम्ही सर्व प्रकारची तयारी करत आहोत, असे काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले.
तालिबानवर नजर
सुरक्षा यंत्रणेशी निगडित एक वरिष्ठ अधिकारी सांगतात, गुप्तचर यंत्रणेला आणखी बळकट केले आहे. सीमेपलीकडे आणि तालिबानच्या हालचालींवर पूर्ण नजर ठेवण्यात आली आहे. काश्मीरमध्ये एलओसीच्या जवळील भागात हालचालींची सूचना मिळालेली नाही. लाँचिंग पॅड सक्रिय आहेत. सरहदीवर सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या जवानांना आणखी सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.