नवी दिल्ली – अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर तालिबानचे शासन कसे असेल याबाबत जगभरात चर्चा सुरू झाली आहे. क्रूरतेच्या अनेक घटनांचे साक्षीदार असलेल्या नागरिकांमध्ये पुन्हा जुन्या तालिबान शासनाच्या आठवणी ताज्या होत आहेत. त्यामुळे तालिबान-२ च्या नेत्यांचे सरकार तालिबान-१ सारखेच भीतीदायक आणि क्रूर असल्याची भीती नागरिकांमध्ये आहे. तालिबान आता नवीन सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामध्ये सुधारणांची प्रतिज्ञा घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु मागील प्रशासनाच्या तुलनेत यंदाच्या प्रशासनामध्ये सुधारणा होण्याची शक्यता खूपच कमी आहे, हे तालिबानच्या नेतृत्वावर नजर टाकल्यावर लक्षात येत आहे.
सध्या तालिबानचे नेतृत्व मौलवी हैबतुल्लाह अखुंदजादा करत आहे. २०१६ मध्ये तो तालिबानचा प्रमुख होता. अखुंदजादा बहुतांश धार्मिक प्रकरणे पाहतो. अनैतिक संबंध ठेवणार्या लोकांची हत्या तसेच चोरी करणार्या लोकांचे हात तोडण्याचे आदेश त्याने दिलेले आहेत. मुूल्ला बरादर हा तालिबानी नेता मुल्ला उमरचा सर्वात विश्वासू सहकार्यांपैकी एक आहे. अफगाण लष्कराविरोधातील कारवाईत तो अत्यंत क्रूर हल्ले करण्याचे नेतृत्व करत होता. २०१८ मध्ये अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी कतार येथे कार्यालय उघडण्यात आले होते. तेव्हा त्याला तालिबानच्या राजकीय दलाचा प्रमुख बनविण्यात आले होते. तालिबानच्या विविध भागाचे प्रमुख कोण आहेत ते पाहूयात.
तालिबान प्रमुख – हैबतुल्लाह अखुंदजादा
२०१६ मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अख्तर मोहम्मद मंसूर मारला गेल्यानंतर हैबतुल्लाह अखुंदजादा तालिबानचा प्रमुख झाला होता. १९८० च्या दशकात त्याने सोव्हियत संघाविरुद्ध अफगाणिस्तानात बंडखोर कमांडरची भूमिका निभावली होती. परंतु तो सैनिक कमांडरऐवजी धार्मिक विद्वान म्हणून अधिक ओळखला जातो. १९९६ पासून २००१ दरम्यानच्या तालिबान प्रशासनादरम्यान न्यायालयीन प्रणालीचा तो प्रमुख होता. तालिबानचा प्रमुख होण्याआधीसुद्धा तो तालिबानच्या वरिष्ठ नेत्यापैकी एक होता. धार्मिक बाबींशी निगडित तालिबानी आदेश तोच देत होता.
तालिबानचे नेतृत्व परिषद
तालिबानच्या नेतृत्व परिषदेत २० वरिष्ठ सदस्यांचा समावेश असतो. उच्चस्तरिय नेत्यांची नियुक्ती करणे हे त्यांचे काम आहे.
उपनेता – अब्दूल गनी बरादर – हा तालिबानचा सहसंस्थापक आहे. पाकिस्तानध्ये २०१० मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. दोहा येथे अमेरिकेसोबत चर्चेपूर्वी २०१८ मध्ये त्याला मुक्त करण्यात आले होते. अफगाणिस्तानमध्ये तो २० वर्षांनंतर परतला आहे.
मोहम्मद याकूब – हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याचा मुलगा आहे. तालिबानच्या परदेशात सुरू असलेल्या कामकाजाची धुरा याकूबवर आहे.
सिराजुद्दीन हक्कानी – सिराजुद्दीन हक्कानी हा हक्कानी नेटवर्क या अमेरिकेकडून प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख आहे. तालिबान आणि अल कायदा या दहशतवाद्यांशी तो जोडला गेला आहे. अमेरिकेने २००९ मध्ये त्याच्यावर पाच लाख डॉलरचे बक्षीस ठेवले आहे. २०१४ मध्ये ते वाढवून १० लाख डॉलर इतके केले होते.
प्रमुख कमांडर – खलील उर रहमानी हक्कानी – हा तालिबानचा वरिष्ठ कमांडर असून तो देणग्या जमा करण्याचे काम करतो. तसेच अफगाणिस्तानातील ऑपरेशनही तो पाहतो. सिराजुद्दीन हक्कान त्याचे काका आहेत. अमेरिकेने खलीलला जागतिक दहशतवादी घोषिक केले आहे. २०११ मध्ये त्याच्यावर पाच लाख डॉलरचे बक्षीस ठेवले होते.
कारी जिया उर रहमान – हा कुणार प्रांतात तालिबानचा वरिष्ठ कमांडर आहे. अलकायदा आणि तालिबान दोघांसाठी काम करतो. आत्मघातकी हल्ल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यानेच शिबिरे सुरू केली आहेत. कुणारमध्ये अमेरिका आणि नाटो सैनिकांविरुद्ध अनेक हल्ले करण्याची योजना त्यानेच आखली होती. या हल्ल्यात अमेरिकेच्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला होता. २०१३ ंमध्ये हवाई हल्ल्यात तो थोडक्यात बचावला होता.
प्रमुख गव्हर्नर – हाजी वफा – कंधार प्रांताचा गव्हर्नर
हाजी तालिब – हेलमंड प्रांताचा गव्हर्नर
निदा मोहम्मद – नगरहार प्रांताचा गव्हर्नर
तालिबानचे प्रवक्ते – जैबुल्लाह मुजाहिद
राजकीय आंतरराष्ट्रीय माध्यम प्रवक्ता – सुहैल शाहीन
अरब माध्यमांसाठी प्रवक्ता – मोहम्मद नईम
आयोग – अब्दूल हकीम, अनस हक्कानी
१५ आयोग
राजकीयशिवाय, गुप्तचर, सैन्य, आर्थि, धार्मिक, नागरिक, सुरक्षा, कृषी, प्रशिक्षण, उच्च शिक्षा, सांस्कृतिक, मल्टिमीडिया, ऊर्जा या विभागांच्या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.