पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत कोर्टयार्ड मेरियेट येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक आणि विद्युत समस्या सोडविण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीला आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारोग मुकादम, मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर, संजय देशमुख, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उद्योगमंत्री सामंत म्हणाले, चाकण औद्योगिक क्षेत्रात विद्युत चार उपकेंद्र स्थापन करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. महावितरणकडून अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. पाणी पुरवठा आवश्यक प्रमाणात करण्याबाबत पाणी पुरवठा मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. स्थानिक उद्योजकांची भूखंडाची मागणी अधिकाऱ्यांनी घ्यावी, त्यांनाही प्राधान्याच्या उद्योगांसोबत भूखंड देण्याबाबत विचार करण्यात येईल.
लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. शासनाची सुविधा घेऊन भूखंडाचा वापर उद्योगांसाठी न करणाऱ्या उद्योगांबाबत माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कामगारांसाठी रुग्णालय उभारण्याबाबत विचार झाल्यास शासनातर्फे आवश्यक सुविधांसाठी सहकार्य करण्यात येईल. उद्योग सुरू करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी मंजुरी प्रक्रियेत अधिक सुलभता आणण्याचा प्रयत्न आहे, त्याचा फायदा उद्योजकांना होईल.
रस्त्याच्या स्थितीबाबत अधिकाऱ्यांनी एकत्रित माहिती द्यावी. या संदर्भात आवश्यक सुधारणा त्वरित करण्यात येतील. औद्योगिक क्षेत्रातील पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित करण्यात यावे, अशा सूचना उद्योगमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
चाकण औद्योगिक क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता येथील समस्या सोडविण्यासाठी, शासनाच्या इतर संबंधित विभागांशी आणि उद्योग संघटनांशी समन्वय साधण्यासाठी नियमित समन्वय बैठका घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील. औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमणाबाबत सर्व्हेक्षण करण्यास सांगितले आहे, सर्व्हेक्षणानंतर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. असेही श्री. सामंत म्हणाले.
हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्कमध्ये जागा उपलब्ध नसल्याने तळेगाव औद्योगिक परिसरातही आयटी उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू असल्याचे श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.
तळेगावला लवकरच नवीन ट्रक टर्मिनल
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत तळेगाव येथील जलप्रक्रिया केंद्र कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या टप्पा क्रमांक १ साठी येत्या १५ दिवसात वाहन तळाची (ट्रक टर्मिनल) सुविधा करण्यात यावी, असे निर्देश श्री. सामंत यांनी यावेळी दिले. बैठकीला एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारोग मुकादम, मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर, संजय देशमुख, उद्योजक आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उद्योगमंत्री सामंत म्हणाले, तळेगाव औद्योगिक क्षेत्रात सुविधा भूखंडाची व्यवस्था करण्यात यावी. उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासोबत नवीन उद्योजक आकर्षित होतील अशा सुविधा विकसित कराव्या. पुण्यात चांगल्या शैक्षणिक संस्था आणि गुणवत्ता असल्याने नव्या जागेचा विकास करताना विद्यार्थ्यांकडून संकल्पना आणि सूचना मागविण्यात याव्या. तज्ज्ञांच्या मदतीने उद्योजकस्नेही असणारा परिसर विकास करावा अशा सूचना त्यांनी दिल्या.
उद्योगमंत्री सामंत यांनी तळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांशी संवाद साधला. उद्योजकांना चांगल्या सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यांनी केलेल्या चांगल्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करण्यात येईल. रस्ता रुंदीकरणाबाबतही विचार करण्यात येईल. उद्योजकांच्या नोंदणीकृत संघटनेच्या कार्यालयासाठी भूखंड देण्यात येईल. उद्योग आणण्यासाठी त्यांना उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.सामंत यांनी बैठकीपूर्वी तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या टप्पा क्रमांक २ साठी जागेची पाहणी केली. जागेसाठी संमतीपत्र दिलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर प्रथम रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, भूखंडाचा विकास करताना उद्योगाच्या गरजा लक्षात घ्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. श्री.सामंत यांनी जेसीबी उद्योगाला भेट देऊन माहिती घेतली. राज्यात उद्योगविस्तार करण्यासाठी शासन सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले