मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तलाठी भरती ऑनलाईन परिक्षेच्या वेळी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागल्याचे वृत्त आहे. औरंगाबाद,नागपुर, अकोला, अमरावती, लातूरसह अनेक ठिकाणी हा गोंधळ होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. तलाठीपदाच्या परीक्षेत अगोदर पेपरफुटी व आता हा सावळा गोंधळ सुरुच असल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
सकाळी नऊ वाजता सुरू होणारी परीक्षा वेळेत सुरु न झाल्यामुळे विद्यार्थी संतापले. ऑनलाईन सेंटरवर ही परीक्षा होत आहे. विद्यार्थी सकाळी साडेसात वाजल्यापासून परीक्षा केंद्रावर हजर आहेत. मात्र नऊ वाजता परिक्षा सुरू होणार असताना सर्व्हर डाऊन असल्याचे सांगण्यात आले. सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांचे लॉगिन होऊ शकले नाही. परिणामी तब्बल अर्धा ते पाऊण तास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर थांबावे लागले.तब्बल पाऊण तासानंतर सर्व्हर सुरळीत सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला आहे.
याअगोदर नाशिकसह काही ठिकाणी तलाठी पेपरफुटी प्रकरण चांगलेच चर्चेत आले. नाशिकच्या पेपरफुटीप्रकरणी संशयित आरोपी गणेश गुसिंगे हा मास्टरमाईंड आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. २०१९ मध्ये झालेल्या म्हाडा भरती आणि २०२१ मध्ये झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यात त्याचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. ही प्रकरण चर्चेत असतांना आता सर्व्हर डाऊनचा प्रकार समोर आला आहे.
विरोधी पक्षनेते म्हणाले
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही याची दखल घेतली आहे. ते म्हणाले की, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तलाठी भरती परीक्षेसाठी लांबचा प्रवास करून परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या लाखो विद्यार्थ्यांना आज प्रचंड मनस्ताप व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी, कष्टकरी व गोरगरिबांच्या मुलांकडून परीक्षेच्या नावावर सरकारने १००० रुपये शुल्क आकारणी करायची, दूरचे परीक्षा केंद्र द्यायचे आणि वरून विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होईल असे व्यवस्थापन करायचे हा धंदाच या सरकारने सुरू केला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत हे सरकार गंभीर नाही ही बाब आता विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना स्पष्ट झाली आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
Talathi Government Recruitment Exam Chaos Server Down