पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोवर विषाणूपासून होणारा आजार आहे. गोवर विषाणू रुग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो. या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे.
ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे, गोव्याची लक्षणे आहेत.गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक-दोन किंवा तीनही लक्षणे असू शकतात. दोन-चार दिवसानंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन संभाव्य धोके टाळता येऊ शकतात, असे आरोग्य विभागाने कळवले आहे.
गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अ जीवनसत्वाचे प्रमाण कमी होते. अ जीवनसत्व कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार व अतिसार, न्युमोनिया, मेंदूज्वर, असे आजार होऊ शकतात. गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस अ जीवनसत्वाची मात्रा दिल्यास हे आजार होण्याची शक्यता कमी असते, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने कळवले आहे.
गोवर रोग टाळण्यासाठी लसीकरण प्रभावी मार्ग असून प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध आहे. लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो. बालकांचे गोवर/रुबेला लसीकरण झाले नसेल त्यांचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो. लसीचा पहिला डोस नऊ महिने पूर्ण ते १२ महिने व दुसरा डोस १६ ते २४ महिने या वयोगटात देण्यात येतो. गोवरची लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
Health Measles Disease Precaution Symptoms Care Home Remedies