इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेस एकूण २२८८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २११३०८ उमेदवारांनी परीक्षा दिली.
सदर परीक्षा IBPS या संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने २७ मे ते ३० मे २०२५ आणि २ जून ते ५ जून २०२५ या कालावधीत राज्यातील २६ जिल्ह्यांतील ६० परीक्षा केंद्रांवर पार पडली होती. बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेसंदर्भातील ताज्या आकडेवारीनुसार, बी.एड. परीक्षेचे १५७५६ व डी.एल.एड. परीक्षेचे १३४२, असे एकूण १७०९८ उमेदवार प्रविष्ठ (Appear) झाले होते. त्यापैकी बी.एड. – ९९५१ व डी.एल.एड. – ८२७, असे मिळून एकूण १०७७८ उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, ज्या उमेदवारांनी आवश्यक व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे निर्धारित मुदतीत परीक्षा परिषदेकडे सादर केलेली नाहीत अशा बी.एड. – ५८०५ व डी.एल.एड. – ५१५, असे एकूण ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.
निकालासंबंधीची गुणयादी व गुणपत्रक (Score List & Score Card) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर www.mscepune.in उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी आपले गुणपत्रक ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत डाउनलोड करून घ्यावे, असे परिषदेने कळविले आहे. विहित मुदतीपर्यंत डाउनलोड न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील आणि नंतर कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.