सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील बहुचर्चित असेलल्या ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या भ्रष्टचाराच्या मुद्द्यावरून तत्कालीन ग्रामसेवक स्वप्निल पांडुरंग ठोके यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्यांच्यावर खातेनिहाय चौकशीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायत १४ वित्त आयोग,१५ वित्त आयोग,ग्रामनिधी सह अनेक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सर्व जिल्ह्यांत चर्चेत होती.याप्रकरणी चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली होती.
ग्रामसेवक ठोके यांनी शासकीय कर्तव्यात कसूर करणे आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम १९६७ चे नियम ३ चा भंग केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी तत्कालीन ग्रामसेवक स्वप्निल पांडुरंग ठोके यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून, ताहाराबाद ग्रामपंचायतीची संपूर्ण दप्तर तपासणी करून त्या अनुषंगाने त्यांची खाते चौकशी सुरू करण्यासाठी १ ते ४ पुराव्याच्या कागदपत्रांसह ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
ताहाराबाद ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक स्वप्निल ठोके यांनी आपल्या कारकीर्दीत ग्रामपंचायतीवर केलेले अनेक प्रताप समोर आले आहेत, ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जुने बस स्थानक ते अंतापुर चौफुली येथील ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर मासिक सभा / ग्रामसभा ठराव न करता परस्पर जागा वाटप करणे व करार नामा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्व परवानगी न घेणे, नमुना नंबर ७ पावतीवर गाळा भाडे वसूली नोंद करून प्रशासनाची दिशाभूल करणे, १४ वित्त आयोगातून सण २०१९ २०२० व २०२१ या वर्षात कामाचे तुकडे पाडून कामे करणे, दरपत्रक न घेता साहित्य खरेदी करणे, साठा रजिस्टर नोंद न घेणे, वाटप रजिस्टर न ठेवणे,१५ वित्त आयोग मधून शालेय गणवेश,पोषण आहार,किमान कौशल्य यांचे साहित्य खरेदी करून, साठा रजिस्टर नोंद न घेणे, वाटप रजिस्टर न ठेवणे, ग्रामपंचायतीचा ग्रामनिधी,पाणीपुरवठा कर वसुलीच्या रकमा बँक खात्यावर जमा न करता परस्पर खर्च करणे, अंदाज पत्रक व मूल्यांकन शिवाय कामे करणे, ग्रामनिधीतून अतिथी व जाहिरातीवर जादा खर्च करणे, ग्रामपंचायतीच्या टँकर दुरुस्ती, घंटागाडी दुरुस्ती डिझेलवर अंदाज पत्रकापेक्षा जास्त खर्च करणे, चुकीच्या अतिक्रमण नोंदी लावणे,ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या इतिवृत्तात खोटे बनावट ठराव टाकून फेरफार करणे, १५ वित्त आयोग निधी मधून कामे न करता निधीचा अपहार करणे, सचिवाची कर्तव्य विवक्षित रीतीने पार न पाडणे आदी मुद्द्यावर ग्रामसेवक स्वप्निल ठोके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या वरील सर्व भ्रष्टाचाराला जबाबदार असलेल्या तत्कालीन ग्रामसेवक ठोके यांना सेवेतून बडतर्फ करून,भ्रष्टाचार केलेली सर्व रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.