नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सटाणा तालुक्यातील तहाराबाद ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच, ग्रामसेवकासह शाखा अभियंत्यावर जायखेडा पोलिस स्टेशनमध्ये मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 वा वित्त आयोगातील एक कोटीचा अपहार लपवत 15 व्या वित्त आयोगातील 14 लाखांच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने गटविकास अधिकारींच्या भूमिकेवरच संशय व्यक्त होत आहे.
गेली अनेक दिवस प्रशासन दरबारी अर्ज, उपोषण, देऊन ही ताहराबाद ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्टयाचाराची योग्य ती चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख सुभाष नंदन यांनी केली होती. याचाच एक भाग म्हणून 18 एप्रिल रोजी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. अखेर त्याची दखल घेत 19 एप्रिल रोजी रात्री उशिरा जायखेडा पोलिसात बागलाणचे गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे दाखल झाले. या अपहार प्रकरणी तक्रार देत त्यांनी संबंधितावर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र स्थानिक आजी माजी लोकप्रतिनिधींनी या बाबत गटविकास अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवरच संशय व्यक्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असें की , तहाराबाद ग्रामपंचायतीचा 14 व्या वित्त आयोगात तत्कालीन ग्रामसेवक व पदाधिकाऱयांनी सुमारे एक कोटीच्या जवळपास अपहार केल्याचा आरोप आहे याबाबत ही चौकशी सुरू आहे. विद्यमान सत्ताधारी गटाच्या काळात 15 वा वित्त आयोगात 14 लाख 65 हजारांचा अपहार झाल्याचा प्राथमिक अंदाज अहवालात आला आहे. तर ग्रामनिधीत व दलित वस्तीतील कामात मोठ्या प्रमाणावर तत्कालीन ग्रामसेवक स्वप्नील ठोके यांनी अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यात ग्रामसेवक ठोके यांना प्रशासनाने निलंबित केले आहे. या प्रकणाची चौकशी सुरू असताना तहाराबाद ग्रामपंचायत व स्थानिक राजकारणामुळे व्यथित झालेल्या तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. नंदन यांनी संबंधित सरपंचासह दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली होती.
गटविकास अधिकारी कोल्हे यांनी 15 व्या वित्त आयोगात झालेल्या 14 लाखांच्या कथित भ्रष्टयाचार प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक स्वप्नील ठोके यांचे सह सरपंच शीतल नंदन, पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियांता यांच्यावर जायखेडा पोलिसात अपहार व लोकसेवक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तहाराबाद ग्रामपंचायतीत 14 वा वित्तआयोगात एक कोटींचा भ्रष्टयाचाराचा आरोप आहे तर 15 वा वित्तायोगसह, ग्रामनिधी व अनु जाती व नवबुद्ध घटकांचा विकास करणे अंतर्गत असलेल्या वस्तीच्या कामात अपहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याबाबत चौकशी समिती ही नेमण्यात आली होती. चौकशी समितीने दिलेल्या अहवालात आणि गटविकास अधिकारी यांनी काल दाखल केलेला गुन्हा याबाबत सत्ताधारी गटाच्या सदस्यनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, गटविकास अधिकारी यांच्या भुमिकेवर संशय व्यक्त केला आहे.
अनुसुचित जाती व नवबुद्ध घटकांचा विकास करणे या योजनेतून तहाराबाद गावात लाखो रुपयांची कामे झाली आहेत मात्र ही योजना ज्यांच्या साठी होती त्यांच्याच वस्तीत होणे अपेक्षित होती. मात्र, ही कामे इतरत्र करण्यात आली असल्याचा ही आरोप विरोधकांनी केला आहे. सदरची कामे जर संबंधित वस्तीत झाली नाहीत तर या योजनेचा निधी हा गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीने वितरित होतो. जर वस्तीत कामे झालीच नाही तर गटविकास अधिकारीनी संबंधितांना या निधीचे वाटप केलेच कसे? असा ही सवाल उपस्थित केला आहे. ग्रामपंचायतीचे दप्तर हे दर महिन्याला तपासण्याचे अधिकार असलेले विस्तार अधिकारीने अनेक महिने दप्तर न तपासल्यानेच भ्रष्टयाचाराची व्याप्ती वाढत गेली. याला जबाबदार जितका ग्रामसेवक आहे, तितकेच विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकारी असल्याचा आरोप सत्ताधारी गटातील सदस्यांनी केला आहे.
या सर्व भ्रष्टाचाराला स्वतः जबाबदार असलेले गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांनी स्वतःच्या बचावापोटी 14 वा वित्त आयोगातील एक कोटींचा भ्रष्टाचार लपवत 15 वा वित्त आयोगातील 14 लाखांच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करणे म्हणजे चोर सोडुन संन्यासाला फाशी देण्याचा प्रकार असल्याचा आरोप सत्ताधारी गटातील काही सदस्यांनी केला आहे. याबाबत जायखेडा पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी तपास करीत आहेत.