चंद्रपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोहर्ली येथील ताडोबा पर्यटन प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण तसेच चंद्रपूर व्याघ्र सफारी व वन्यजीव बचाव केंद्राच्या प्रस्तावित कामांचे सादरीकरण राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत वनअकादमी येथे करण्यात आले. यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रस्तावित कामांचा व पर्यटन क्षेत्राचा आढावा घेतला.
यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक बी. एस. हुड्डा, वन अकादमी (चंद्रमा)चे संचालक श्रीनिवास रेड्डी, अपर संचालक प्रशांत खाडे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगांवकर, उपसंचालक नंदकिशोर काळे तसेच विविध वनविभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, वनविभागातील विकासकामे करतांना अतिशय उत्तम व वैशिष्ट्यपूर्ण अशी करावीत. प्रवेशद्वाराचे काम सुसज्ज व नाविन्यपूर्ण कसे करता येईल ते बघावे. चंद्रपूर-मुल राष्ट्रीय महामार्गालागत वन्यजीव बचाव केंद्र (रेस्क्यू सेंटर) प्रस्तावित आहे. महाराष्ट्रातील नवे तर देशातील चांगले रेस्क्यू सेंटर या ठिकाणी तयार करावे. जगातील चांगले बर्डपार्क भारतात निर्माण करता यावे, यासाठी दुबई, सिंगापूर व जामनगर येथील बर्डपार्कला वनाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी.
शक्ती आणि सौंदर्य यांचे प्रतीक असलेला वाघ या विलक्षण प्राण्याचा संचार ताडोबात असल्याने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पास राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. देशातील व विदेशातील पर्यटकांचा ओघ ताडोबाकडे वाढत असून व्याघ्र दर्शनासाठी एक हमखास प्रकल्प म्हणून ताडोबाची ओळख निर्माण झाली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांकरीता उत्तम दर्जाची सुविधा निर्माण करणे, पर्यटनाचा दर्जा उंचावून त्यास आंतरराष्ट्रीय पातळीचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे याकरीता विविध विकासाची कामे करण्यात येत आहे. त्याअंतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रातील मोहर्ली, पांगडी व कोलारा या प्रवेशद्वारांचे सुशोभीकरणाचे काम तसेच चंद्रपूर व्याघ्र सफारी व वन्यजीव बचाव निर्मिती करण्यात येत आहे. सदर कामे ही प्रस्तावित असून पूर्णत्वास येणार आहेत.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर येथे चंद्रपूर-मुल राष्ट्रीय महामार्गालगत वन प्रबोधिनीच्या बाजूला व्याघ्र सफारी निर्माण करण्याच्या दृष्टीने जागेची निवड करण्यात आली आहे. याच परिसरात वन्यजीव बचाव केंद्र प्रस्तावित असल्याने दोन्ही प्रकल्पाला एकमेकांना पूरक अशी व्यवस्था निर्माण होईल. त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचा ताण कमी होऊन स्थानिकांना रोजगार निर्मिती होण्यास मदत मिळणार आहे. त्यासोबतच वनपरिक्षेत्र चंद्रपूर यांच्या कार्यक्षेत्रातील मामला प्रवेशद्वारालगत निसर्ग शिक्षण संकुल तयार करणे प्रस्तावित आहे. मदनापुर येथे निसर्ग शिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. याद्वारे विविध प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. पांगडी येथे उपजीविका केंद्राची सुरुवात करून एकूण 210 युवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
पर्यटन वाहनांच्या सनियंत्रणाकरीता बघीरा संगणकीय प्रणाली माहे-नोव्हेंबर 2020 मध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे पर्यटन जिप्सी वाहनाच्या वेगावर नियंत्रण, नमूद पर्यटन रस्त्यावर फिरण्याकरिता नियंत्रण ठेवणे आदी कार्य सोपे झाले आहे. पर्यटन सुविधांकरीता स्वतंत्र अशी वेबसाईट ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू करण्यात आली. पर्यटकांना विश्रांतीकरीता निवारा, फायर व्यवस्थापन, वणवणवा नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. आदीं विषयांची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांना दिली.
Tadoba Andhari Tiger Project Work