नाशिक – महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर या संस्थेमार्फत ओबीसी, विजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शनिवार १३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी १०.३० वाजता टॅबचे वाटप करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने लाभार्थी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थांमार्फत गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी वेळोवेळी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. आर्थिक परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करता येत नाही किंवा खाजगी क्लासेसची फी भरण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नाही अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी महाज्योती या संस्थेमार्फत मोफत ऑनलाईन प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत टॅब सोबत दररोज सहा जीबी इंटरनेट डेटाची सुविधा नीट परीक्षा होईपर्यंत साधारण दिड वर्षे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती, महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
महाज्योती या संस्थेमार्फत गरजू व आर्थिकदृष्ट्या मागास असणारे विद्यार्थी तसेच इयत्ता ११ वी या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेले व इंजिनिअरींग आणि मेडीकल या क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी पुर्व परिक्षेची तयारी करणाऱ्या अशा एकुण तीन हजार विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षणही देण्यात येत आहे, असेही महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.