इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेट जगभरातील अनेकांचा आवडता खेळ मानला जातो. भारतात बहुतांश नागरिक क्रिकेटप्रेमी आहेत. त्यामुळे क्रिकेटचे सामने कधी होणार? याची प्रत्येकाला उत्सुकता असते, मग आयपीएल असो की टी-20 सामने. त्याच्या तारखा जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. या वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले असून भारताचा पहिला सामना संघाच्या पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशीच होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
भारताला या स्पर्धेतील पहिला सामना दि. 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. 2015 च्या विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा सामना ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथे झाला होता. स्पर्धेचे पहिले 6 दिवस म्हणजे 16 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सामना खेळवला जाईल. त्यानंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 चे सामने सुरू होतील.
T20 विश्वचषकाची आठवी आवृत्ती 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात ठिकाणी खेळवली जाईल. 13 नोव्हेंबर रोजी MCG येथे अंतिम सामना खेळवला जाईल. सुपर 12 साठी संघ दोन गटात विभागले गेले आहेत. गट 1 मध्ये सध्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. तर दुसरीकडे भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश गट 2 मध्ये आहेत.
पहिल्या फेरीच्या निकालानंतर या 8 संघांव्यतिरिक्त आणखी 4 संघ सुपर 12 मध्ये पोहोचतील. गतविजेता आणि यजमान ऑस्ट्रेलियाचा सामना 22 ऑक्टोबरला सुपर 12 च्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडशी होणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 आंतरराष्ट्रीय संघ 45 सामने खेळणार आहेत.
https://twitter.com/T20WorldCup/status/1484303360954347520?s=20
टी-20 विश्वचषकात भारताला ग्रुप-2 मध्ये ठेवण्यात आले आहे. या गटात भारतासोबतच बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांचाही समावेश आहे. भारतीय संघ आपला दुसरा सामना दि. 27 ऑक्टोबर रोजी गट 1 च्या उपविजेत्या संघासोबत खेळणार आहे. यानंतर दि. 30 ऑक्टोबरला भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा सामना खेळायचा आहे. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारत दि. 2 नोव्हेंबरला अॅडलेडच्या ओव्हलवर बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरेल. शेवटच्या गटात त्यांचा सामना दि. 6 नोव्हेंबर रोजी एमसीजीमध्ये ब गटातील विजेत्याशी होईल.
T20 विश्वचषक 2022 चे उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी खेळवले जातील. त्याच वेळी, त्याचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळवला जाईल. साधारणता सेमीफायनल आणि फायनल या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता असते हे सामने स्टेडियमवर किंवा टीव्हीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी दिसून येते.
भारताचे सामने असे
– भारत विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड – 23 ऑक्टोबर
– भारत विरुद्ध गट अ उपविजेता, सिडनी क्रिकेट ग्राउंड – 27 ऑक्टोबर
– भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ स्टेडियम – 30 ऑक्टोबर
– भारत विरुद्ध बांगलादेश, अॅडलेडवर – 2 नोव्हेंबर
– भारत विरुद्ध गट ब उपविजेता संघ – मेलबोर्न – 6 नोव्हेंबर