मुंबई – भारत पाकिस्तान दरम्यानचा सामना म्हणजे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच असते. नुकताच हा हाय व्होल्टेज सामना पार पडला. सामन्यापूर्वी विविध माध्यमांतून त्याचीच चर्चा होत होती. प्रत्यक्ष सामना सुरू झाला तेव्हा अनेकांनी आपले श्वास रोखून धरलेले होते. भारताने नेटाने फलंदाजी करत आपली धाव संख्या दीडशेपार केली. मात्र एक एक करून भारताला आपले फलंदाज गमवावे लागले आणि पाकिस्तानचा संघ वरचढ ठरत गेला. पाकिस्तानने मात्र आपल्यापुढचे आव्हान लवकरच निकाली काढले आणि भारताचा पराभव केला. तो भारतीय संघाच्या चाहत्यांना चांगलाच जिव्हारी लागला.
त्यानंतर रविवारच्या सामन्यातून म्हणजेच न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यातून भारताला आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांना प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र भारताचा येथेही दारूण पराभव झाला. सलग दोन वेळा पराभव झाल्याने गुणतालिकेमध्ये भारत पाचव्या स्थानावर गेला आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा भारताचा प्रवास आता खडतर होणार आहे. मात्र तरीही भारताचे उपांत्य फेरीत पोहोचण्याचे आव्हान कायम आहे. त्यासाठी म् काही घडामोडी घडणे आवश्यक आहे पुढील गोष्टी झाल्या, तरच भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकतो.
पहिली गोष्ट म्हणजे अफगाणिस्तान, भारताला अफगाणिस्तानवर आता आशा केंद्रीत करायला हव्या. कारण अफगाणिस्तानानने पाकिस्तानला घाम फोडलेला होता. त्यामुळेच जर अफगाणी संघाने न्यूझीलंडला मोठ्या फरकाने हरविले, आणि भारताने तिन्ही दुबळ्या संघांना दणदणीतरित्या पराभूत केले, तरच भारताला उपांत्य फेरीच्या आशा ठेवता येतील.
भारताचे पुढील सामने स्कॉटलंड, अफगाणिस्तान, नामिबिया या संघांविरूद्ध आहे. या प्रत्येक सामन्यात 100 धावांच्या फरकाने भारताला विजय मिळवावा लागणार आहे. याशिवाय रनरेटही खूप वाढवावा लागणार आहे. इतकंच नव्हे, तर स्कॉटलंड आणि नामिबिया संघाकडून न्यूझीलंडचा संघ पराभूत होणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी झाल्या तरच भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. अन्यथा भारताचे रिटर्न तिकीट नक्की होणार आहे.