इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताने झिम्बाब्वेवर शानदार विजय मिळविला आहे. त्यामुळे भारत आता थेट सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. भारताने दिलेले १८७ धावांचे आव्हान झिम्बाब्वेला पेलवले नाही. त्यांचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. त्यामुळेच झिम्बाब्वेला पराजय पत्करावा लागला. झिम्बाब्वे संघाचे विश्वचषकातील कारकीर्द संपुष्टात आली आहे. भारताने झिम्बाब्वेवर ७१ धावांनी विजय मिळविला आहे. आता सेमीफायनलमध्ये भारताचा संघ इंग्लंडला आव्हान देणार आहे.
भारताने पहिल्यांदा फलंदाजी करीत झिम्बाब्वे समोर १८७ धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीर लोकेश राहुलने शानदार ५१ धावा केल्या. धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव हा नाबाद राहिला त्याने सर्वाधिक ६१ धावा केल्या. रोहित शर्माने १५ तर विराट कोहलीने २६ धावा केल्या. हार्दिक पांड्या १८ धावांवर बाद झाला. भारताने २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १८६ धावा केल्या.
झिम्बाब्वेचा संघ आव्हान घेऊन मैदानात उतरला खरा पण बारतीय गोलंदाजांनी त्यांची चांगलीच भंबेरी उडविली. त्यामुळेच त्यांचे फलंदाज एकामागोमाग एक तंबूत परतत गेले. अवघ्या २५ धावा असतानाच त्यांचे ४ फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर सिकंदर रजा आणि रायन बर्ल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. रजाने ३४ तर बर्लने ३५ धावा केल्या. झिम्बाब्वेचा संघ १७ षटकातच ११५ धावांवर गारद झाला.
भारताच्यावतीने रवींचंद्रन अश्वीन, मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्याने भेदक गोलंदाजी केली. अश्वीनने ३ तर शमी आणि पांड्याने प्रत्येकी २ बळी घेतले.
T20 World Cup India Win Against Zimbabwe