इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने हरवले आहे. या संघांचा सामना सुरु असतानाच पावसाचा व्यत्यय आला पण या व्यत्ययाचा पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे फायदाच झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना पाकिस्तानने डकवर्थ – लुईस – स्टेन पद्धतीने ३३ धावांनी जिंकला. या विजयामुळे पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान कायम असून भारताचं मात्र त्यामुळे टेन्शन वाढलं आहे.
बांगलादेशचा संघर्षपूर्ण लढतीत ५ धावांनी पराभव करत उपांत्यफेरीतील मार्ग सुखकर केला असला तरी नेट रन रेटच्या बाबतीत भारत पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेहून मागे आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्या सामन्यानंतर भारत दुसऱ्या गटामध्ये अव्वल स्थानी आहे. मात्र तरी उपांत्यफेरीमध्ये कोणता संघ जाणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यातच पाकिस्तानच्या या मोठ्या विजयामुळे या गटातील चुरस अधिक वाढली आहे. पाकिस्तानने निर्धारित २० षटकांमध्ये १८५ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर धावांचा पाठलाग करणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ अगदी सहाव्या षटकापर्यंत डकवर्थ – लुईस – स्टेन पद्धतीच्या आकडेमोडीनुसार आघाडीवर होता. मात्र नंतर एकामागोमाग पडलेल्या विकेट्स आणि पावसामुळे सामना १४ षटकांचा खेळवायला लागल्याने दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला. पावसामुळे काही वेळ खेळ थांबल्यानंतर पुन्हा खेळाडू मैदानावर उतरले तेव्हा डकवर्थ-लुईस-स्टेन पद्धतीनुसार दक्षिण आफ्रिकेसमोर पाच षटकांमध्ये ७३ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. मात्र ३० चेंडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेला यापैकी ४० धावाच करता आल्या. पाकिस्तानी गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी केली आणि वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा डाव गडगडला असल्याचं दिसून आलं आहे.
पाकिस्तानची दुसऱ्या स्थानी झेप
या सामन्यानंतर गुणतालिकेमध्ये पाकिस्तानने दोन स्थानांनी झेप घेतली असून या विजयासह पाकिस्तान आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर पराभूत झालेला दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे त्याच ठिकाणी म्हणजे दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघ सर्वाधिक गुणांसहीत म्हणजेच ६ गुणांसहीत अव्वल स्थानी असला तरी नेट रन रेटच्या बाबतीत अव्वल तीनमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. चारपैकी एका सामन्यात पराभव झाल्याने भारताच्या नावावर सहा गुण असून भारताचा नेट रन रेट हा +०.७३० इतका आहे. नेट रन रेटच्याबाबतीत पाकिस्तान भारताच्या पुढे आहे. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन दोन गुण मिळवले असून या विजयासहीत बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. आपले पहिले दोन्ही सामने पाकिस्तानने अंतिम चेंडूवर गमावल्याने त्याचा नेट रन रेट भारताहून अधिक सरस आहे.
आता पुढे काय
पाकिस्तान आज दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाला असता तर भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश अधिक सुखकर झाला असता आणि पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आलं असतं. पाकिस्तानच्या पराभवामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतावर कमी प्रेशर असतं. मात्र पाकिस्तानने सुपर १२ फेरीतील आपला उर्वरित सामना मोठ्या फरकाने जिंकला आणि झिम्बाब्वेने रविवारी भारताला हरवले तर नेट रन रेटच्या आधारे पाकिस्तान गुणतक्त्यात भारताच्या पुढे जाईल. मात्र आजच्या सामन्यानंतर गुणांच्या आधारे तरी पाकिस्तान भारताच्या खालीच आहे. पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकला तर नेट रन रेट वाढवण्याबरोबरच त्यांचे सहा गुण होतील आणि ते भारताहून सरस ठरतील.
रविवारी करो या मरो
भारताच्या हातात आता रविवारी होणारा झिम्बाब्वेविरुद्धचा एकमेव सामना शिल्लक आहे. झिम्बाब्वेला लिंबू – टिंबू संघ समजणं पाकिस्तानप्रमाणे भारतालाही महागात पडू शकतं. त्यामुळेच भारत या सामन्यामध्येही मोठ्या विजयासहीत उपांत्यफेरीत आपलं स्थान पक्क करण्याच्या निर्धारानेच मैदानात पाऊल ठेवावे लागणार आहे.
T20 World Cup India Pakistan Semifinal