मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टी२० विश्वचषक २०२२ ला आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला आहे आणि त्याच दरम्यान टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. आशिया चषक २०२२ मध्ये दुखापतीमुळे बाहेर पडलेला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसह संघात पुनरागमन केले, परंतु आता तो टी२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, पाठीच्या ताणामुळे बुमराह या मेगा स्पर्धेत खेळू शकणार नाही. बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T२० आंतरराष्ट्रीय मालिकेचा भाग होता. परंतु २८ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात पाठदुखीमुळे खेळला नाही. बुमराहला पाठीचा स्ट्रेस फ्रॅक्चर झाला आहे आणि यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेव्यतिरिक्त टी२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.
मोहम्मद शमीचा टी२० विश्वचषक संघात स्टँडबाय म्हणून समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे बुमराहच्या जागी तो संघात सामील होऊ शकतो, तर मोहम्मद सिराजला स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत टाकले जाऊ शकते. बुमराहचा अशाप्रकारे बाहेर पडणे टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. पीटीआयने सांगितले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. मात्र, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
T20 World Cup India Cricket Team Player