नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना नंतर साजऱ्या होत असलेल्या दिवाळीमुळे सर्वत्र उत्साह असला तरी एक पणती वंचीतांसाठी अशाप्रकारची सामाजिक जाणिव ठेवून नाशिकच्या धर्मदाय सहआयुक्त कार्यालयाच्या वतीने वस्त्रदान हा खेड्यापाड्यातील गरीबांवर मायेची चादर घालण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. नाशिकचे धर्मदाय सहआयुक्त टी. एस. अकाली यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येणार असून त्यात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे कार्य निरंतर सुरूच राहणार असून अशाप्रकारचे सामाजिक बांधीलकीत सहभागी होणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून करा दान, मिळवा मान अशाप्रकारचा उपक्रम राबवला जाणार आहे. गरजूंना कपडे दान करणाऱ्या व्यक्तींपैकी काही भाग्यवान दानशुरांचा धर्मदाय सहआयुक्त टी. एस. अकाली यांच्या हस्ते स्नेह भेट देऊन सन्मान करण्यात येणार आहे. समाजातील अनेक घटक हे दिवाळी सण तर सोडा परंतु आपल्या व्यक्तीगत आयुष्यात दैनंदिन कपडे घेण्याच्या स्थितीत नसतात. अशावेळी त्यांना नवीन कपडे शक्य नसले तरी आपल्याकडील जुने आणि वापरण्यायोग्य कपडे जरी अशा गरीबांना दिल्यास त्यांची गरज भागु शकेल या उद्देशाने गरजूंना कपडे देण्याचे महादान उपक्रम धर्मदाय सहआयुक्त कार्यालयातर्फे राबवला जाणार आहे. नागरीकांनी आपल्याकडील जुन्या परंतु वापरण्या योग्य कपडे आणून दिल्यानंतर ते खेड्यापाड्यातील नागरीकांना देण्यात येणार आहेत. या पुण्य कार्यात सहभागी होऊ इच्छीणाऱ्यांनी गोविंद नगर लिंकरोडवरील आरडी सर्कल जवळ असलेल्या क्रिष्णम या वस्त्र प्रावरणांच्या दुकानात अथवा मोबाईल क्रमांक ७७७००२४४०० या क्रमाकांवर संपर्क साधावा असे आवाहन धर्मदाय सहआयुक्त टी. एस. अकाली यांनी केले आहे.