मुंबई – काहीही करा पण भ्रम पाळू नका अशी म्हण भारतात म्हटली जाते. भारतापासून २२०० किलोमीटर दूर दुबईमध्ये गेल्या रविवारी भ्रमाचा भोपळा फुटला होता. आज दुसर्या भ्रमाचा भोपळा फुटण्याची शक्यता आहे. कारण यूएईमध्ये जेव्हा भारत टी-ट्वेंटी विश्वचषक खेळण्यासाठी उतरला तेव्हा भारतीय चाहत्यांना दोन गोष्टी ठाऊक होत्या. पहिली म्हणजे भारत एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी विश्वचषकात पाकिस्तानविरोधात कधीही पराभूत झाला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे न्यूझीलंडविरुद्ध टी-ट्वेंटी विश्वचषकात भारत कधी जिंकू शकला नाही. किमान न्यूझीलंडविरुद्ध पराभूत होण्याचा हा भ्रम भारत नक्कीच तोडेल अशी चाहत्यांना आशा आहे.
पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाबद्दलचा एक भ्रम तुटला. आता विराटच्या या सेनेने न्यूझीलंडला रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात पराभूत केले तर दुसरा भ्रमही तुटणार आहे. यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना दिलासा मिळणार आहे. भारतासाठी हा सामना करो या मरो सारखाच असेल. सुपर १२ चा या सामन्यात पराभूत झाल्यास भारताची उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग खूपच खडतर ठरेल. कारण यानंतर न्यूझीलंड स्कॉटलंड, नामिबिया आणि अफगाणिस्तानसारख्या संघांसोबत खेळणार आहे. भारताप्रमाणेच न्यूझीलंडचा संघा सुद्धा पाकिस्तानविरुद्ध पराभूत झालेला आहे.
संघात दोष नाही, रणनीती फसतेय
भारतीय कर्णधार विराट कोहली शनिवारी पत्रकार परिषदेत म्हणाला, की पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरलेला भारतीय संघ कायम राहण्याची शक्यता आहे. हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार यांना हटवून शार्दुल ठाकूर आणि ईशान किशन यांना खेळवण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु संघात बदल करण्यास विराट अनुत्सुक आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय संघ मैदानात कमी आणि ड्रेसिंग रूममध्ये सामने हरलेला आहे. म्हणजेच संघामध्ये समस्या नसून ती रणनीती बनविण्यात आहे. २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१९ मधील एकदिवसीय विश्वचषक आणि या वर्षी झालेल्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाची रणनीती नापास झाली आहे.
पंड्याला खेळविणे किती योग्य?
पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या निवडीमुळे भारतीय संघाचे नुकसान झाले आहे. कारण त्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले होते. त्या सामन्यात त्याच्या खांद्याला चेंडू लागला होता. त्यानंतर पंड्याने पुन्हा तंदुरुस्तीची चाचणी दिली आहे. त्यामध्ये तो उत्तीर्ण झाला आहे. विराटशिवाय उपकर्णधार रोहित शर्मा आणि मेंटॉर महेंद्रसिंग धोनीचा पंड्यावर विश्वास आहे. परंतु तो स्वतः संघाला विजय मिळवून देण्यास सज्ज आहे का हा प्रश्न आहे. आजच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याला खेळविण्याची जोखीम घ्यावी का? विराट म्हणाला, की सहा गोलंदाजांची आवश्यकता परिस्थितीतवर अवलंबून असेल. गेल्या सामन्यात तशी परिस्थिती नव्हती. अशी परिस्थिती निर्माण झाली तर मी दोन षटके फेकू शकतो. पंड्यासुद्धा एक किंवा दोन षटके टाकू शकतो.
संघात बदलाची शक्यता कमीच
तुम्हाला संघात सात आणि आठव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू हवा असेल तर रवीद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर अगदी योग्य खेळाडू आहेत. शार्दुल ठाकूरने इंग्लंड दौर्यासह आयपीएलमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. पाकिस्तानविरुद्ध भारतीय गोलंदाज एकही गडी बाद करू शकले नाही. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनीही भारतीय गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. विस्मयकारक फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने सुरुवातीचे दोन षटके चांगली फेकली. परंतु नंतरच्या षटकांमध्ये त्याने खूप धावा दिल्या. भुवनेश्वर आणि मोहम्मद शामी निष्फळ ठरले. भुवनेश्वरच्या जागी शार्दुलला खेळविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वरुणच्या जागी अश्विन किंवा राहुल चाहर यांच्यापैकी एकाला संधी देण्याची मागणी होत आहे. परंतु संघ व्यवस्थापन बदल करण्याच्या मूडमध्ये नाहीय.