क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. तुमचा संघ कागदावर कितीही मजबूत असला किंवा आकडेवारी कितीही तुमच्या बाजूने असली तरी ज्या दिवशी प्रत्यक्ष सामना आहे त्या सामन्यात तुम्ही कशी कामगिरी करता, यावरच विजयाचे पारडे फिरणार हे निश्चित असते, याची अनुभूती भारतीय संघाला आज पाकिस्तानविरुद्ध अनुभवायला मिळाली. टी२० वर्ल्ड कप साखळी सामन्यात पाकिस्तान विरुद्धचा सामना खरेतर भारतीय संघाने तेव्हाच गमावला होता जेव्हा मजबूत समजल्या जाणाऱ्या भारतीय फलंदाजांनी विजयासाठी फक्त १५२ धावांचे आव्हान पाकिस्तान समोर ठेवले होते. पाकिस्तानने हे आव्हान कुठलाही बळी न गमावता १७.५ षटकात पूर्ण करून या सामन्याच्या निर्णयासंर्भात अगोदर वर्तविली गेलेली सगळी भाकीते खोटी ठरविली आणि सामना जिंकला. पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान (७९ धावा) आणि बाबर आझम (६८ धावा) या दोन फलंदाजांनी नाबाद राहून हा विजय मिळवला ही भारतीय गोलंदाजांसाठी अतिशय लाजिरवाणी बाब मानली जाते आहे.