दुबईतल्या टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान या रोमांचक सामन्यात टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी प्रथम आमंत्रण देणाऱ्या पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघाने २० षटकात ७ बाद १५१ धावा केल्या आहेत. पहिल्या दोन षटकातच भारताचे दोन्ही नामवंत सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर भारतीय संघाच्या गोटात खरेतर सुरुवातीलाच घबराट पसरली होती. परंतु त्यानंतर कर्णधार विराट कोहली, मधल्या फळीतला भरवशाचा सूर्यकुमार आणि त्यानंतर भारतीय संघात धोनीची जागा घेऊ पाहणारा यष्टीरक्षक फंलदाज ऋषभ पंत यांनी दमदार खेळी केल्याने एका समाधान कारक धावसंख्येवर भारतीय संघाची पहिली इनिंग संपली आहे. आता भारताने पाकिस्तानला २० षटकात विजयासाठी १५२ धावा करण्याचे आव्हान दिले आहे. खास करून स्विंग गोलंदाजीला सोबत देणाऱ्या या खेळपट्टीवर भारताच्या भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, वरून चक्रवर्ती आणि अशा अटीतटीच्या लढतीत ज्याचे नाव घेणे कदापी विसरता येणार नाही, अशा जसप्रीत बुमरा समोर पाकिस्तानी फलंदाज काय करतात? यावर सामन्याचे सगळे भवितव्य अवलंबून राहील.