इंडिया दर्पण विशेष लेखमाला
जगातले सर्वांत मोठे मंदिर – भाग -७
स्वामी विवेकानंदाचे साकार झालेले स्वप्न
कोलकत्याचा बेलूर मठ!
(क्षेत्रफळ १ ,६० ,००० स्क्वेअर मीटर)
इंडिया दर्पण च्या जगातील सर्वांत मोठे मंदिर या मालिकेत आज आपण कोलकात्याच्या विश्व प्रसिद्ध बेलूर मठाची माहिती घेणार आहोत. ४० एकर जागेवर उभ्याअसलेल्या या बेलूर मठाची मुळ कल्पना स्वामी विवेकानंद यांची होती. आता परवा म्हणजे दिनांक 12जानेवरी रोजी स्वामी विवेकानंद यांची १६० वी जयंती जगभर प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली. बेलूर मठ हे जगभर फिरलेल्या द्रष्टया स्वामी विवेकानंद यांचे स्वप्न होते. विशेष म्हणजे स्वामींनी देह्त्याग केल्यानंतर सुमारे ३०वर्षांनी त्यांनी पाहिलेले हे स्वप्न प्रत्यक्षांत साकार झाले. बेलूर मठ हे ‘रामकृष्ण मठ’ आणि ‘रामकृष्ण मिशन’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभर कार्य करणार्या संस्थेचे मुख्यालय आहे. कोलकात्यात हुगळी नदीच्या पश्चिम किनार्यावर ४० एकर जागेवर बेलूर मठाची स्थापना करण्यात आली आहे.
बेलूर मठातील प्रत्येक वास्तु आणि मंदिरं वैशिष्ट्येपूर्ण आहेच परंतु या परिसरातील सर्वांत आकर्षक आहे ते रामकृष्ण परमहंस यांचे मंदिर. वस्तुकलेचा हा सगळ्या जगात एकमेवाद्वितीय नमूना आहे. या वास्तुकड़े पाहिल्यावर हिदुंना ते आपले मंदिर दिसते, इस्लाम धर्मियांना तिथे आपली मस्जित दिसते, बौद्ध धर्मियांना आपल्या स्तुपाचा आभास होतो तर ख्रिश्चन धर्मियांना तिथे साक्षांत चर्च दिसते. हेच या वास्तुचे वैशिष्ट्ये आहे.
शिकागोच्या सर्व धर्म परिषदेत सहभागी होण्यापूर्वी स्वामी विवेकानंद यांनी परिव्राजक बनुन हिमालया पासून कन्याकुमारी पर्यंत देशभर पायी भ्रमण केले. या भ्रमंतीत त्यांनी जगप्रसिद्ध ताजमहल, फत्तेपुर सिकरी, राजस्थानातील अनेक राजमहल, नामवंत वास्तु ,सुप्रसिद्ध मंदिरं, वेरुळ-अजिंठा लेणी, अनेक प्रेक्षणीय स्मारके जाणकार नजरेने पहिली,त्याच प्रमाणे यूरोप अमेरिकेच्या भ्रमंतीत अनेक ऐतिहासिक ठिकाणे तिथल्या जगप्रसिद्ध वास्तु, इमारती पहिल्या या सगळ्याची नोंद त्यांच्या चिंतनशील मनाने घेतली आणि या सर्वांचे प्रतिबिंब बेलूर मठातील प्रत्येक वास्तूत पडलेले पहायला मिळते.
स्वामी विवेकानंद यांचे हे स्वप्न म्हणजेच त्यांच्या कल्पनेतील हे मंदिर त्यांच्या देहावसनानंतर त्यांचे गुरुबंधु स्वामी विज्ञानानंद यांनी सुमारे ३० वर्षांनी अगदी हुबेहूब साकारले. स्वामी विज्ञानानंद संन्यास घेण्यापूर्वी सिविल इंजिनीयर होते त्यांच्या ज्ञानाचा असा उपयोग झाला. कलकत्याचे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आणि बिल्डर मेसर्स मार्टिन बर्न आणि कंपनी यांच्या मदतीने त्यांनी बेलूर मठातील मंदिरं, आणि इतर वास्तु बांधल्या. बेलूर मठाच्या स्थापनेचा पहिला दगड रामकृष्ण परमहंस यांच्या जन्मदिनी 13 मार्च १९२३ रोजी रामकृष्ण मठ आणि मिशनचे तत्कालीन अध्यक्ष स्वामी शिवानन्द यांनी रचला आणि 14 जानेवारी १९३८ या मकरसंक्रांतिच्या दिवशी या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.सुमारे १५ वर्षे हे बांधकाम सुरु होते. वास्तु शास्त्रानुसार बेलूरमठाच्या प्लेटफार्मची लांबी २३५ फुट, रुंदी १४०फ़ुट, उंची ६ फुट असून मुख्य मंदिराची लांबी २०२ फुट, रुंदी ८० फुट आणि उंची १०४ फुट आहे. १९३८ साली या बांधकामासाठी ८ लाख रूपये खर्च आला ही सगळी रक्कम स्वामी विवेकानंद यांच्या अमेरिकेतील दानशूर अनुयायांनी दिली.
हुगली नदीच्या पश्चिम किनार्यावर ४० एकर जागेवर म्हणजे सुमारे १,६०,००० स्क्वेअर मीटर जागेवर बेलूर मठाची स्थापना करण्यात आली आहे. बेलूर मठाचे सर्वांत प्रमुख आकर्षण म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस, शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद यांच्या पवित्र अस्थि आणि त्यांची मंदिरं आहेत. या विशाल परिसरांत रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांच्या कार्याची माहिती देणारे संग्रहालय आहे. तसेच रामकृष्ण मिशन संचालित अनेक शैक्षणिक संस्था, कॉलेजस, विद्यापीठ, दवाखाने आणि हॉस्पिटल्स तसेच एकाच वेळी १०,००० व्यक्ती जेवण करू शकतील अशा मोफत भोजनालयाच्या अद्ययावत इमारती आधुनिक किचन येथे आहेत. बेलूर मठ हे केवळ स्वामी विवेकानंद यांच्या भक्तांचे श्रद्धास्थानच नाही तर अंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थल देखील आहे. भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ‘राष्ट्राचा संपन्न वारसा आणि राष्ट्रीय महत्वाचे स्थान’ अशा शब्दांत बेलूर मठाचा गौरव केला होता.
ऊपर लहराता भगवा..नीचे बहती ज्ञान की धारा..ऐसा है स्वामी विवेकानंद का बेलूर मठ..#Video pic.twitter.com/4Jh8nHXyM3
— Kreately.in (@KreatelyMedia) October 1, 2022
एकमेवाद्वितीय रामकृष्ण मंदिर
बेलूर मठातील सर्वांत प्रमुख आणि प्रेक्षणीय आकर्षण केंद्र म्हणजे मठाच्या दर्शनी भागांत असलेले श्री रामकृष्ण मंदिर. स्वामी विवेकानंद यांच्या कल्पनेनुसार वास्तुकार स्वामी विज्ञानानंद यांनी ३० वर्षांनंतर अगदी हुबेहूब हे मंदिर साकरले आहे. १४ जानेवारी १९३८ रोजी मकरसंक्रांतिच्या दिवशी श्री रामकृष्ण मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. श्रीरामकृष्ण मंदिर म्हणजे जगातील विविध धर्मांच्या एकतेचे जगातील एकमेव प्रतिक आहे. या मंदिराकडे पाहिल्यावर ते एखाद्या मस्जित, बौद्ध स्तूप, चर्च किंवा मंदिरासारखे दिसते. ज्याची जशी भावना तशी ही वास्तु दिसते. खरं तर आजच्या युगांत हाच एक मोठा चमत्कार मानला जातो.
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार सांचीचा बौद्ध स्तूप आणि अजिंठा वेरुळच्या गुंफेतील प्रवेशद्वाराची आठवण करुन देते. प्रवेशद्वाराची रचना दक्षिण भारतातील उंच गोपुरावरून घेण्यात आली आहे. मंदिराच्या आतले सज्जे, बाल्कनी आणि खिडक्या राजस्थानातील हवामहलची आठवण करून देतात. सज्जे आणि खिडक्यांवर राजपूत आणि मुघल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. बेलूर मठातील मुख्य मंदिराचा घुमट फ्लोरेंस कथेड़्रलच्या डोमवरुन घेण्यात आला आहे. तर मंदिराचे फ्लोरिंग ख्रिश्चन क्रॉस सारखे केलेले आहे. बेलूर मठातील या प्रमुख मंदिराचे क्षेत्रफळ ३२,९०० वर्ग फुट असून उंची ११२.५ फुट आहे या मंदिराच्या प्रत्येक इंचन इंच भागावर जगातील कोणत्या न कोणत्या धार्मिक वास्तुची प्रतिकृती पहायला मिळते.
श्रीरामकृष्ण मंदिर चुनार स्टोन पासून तयार करण्यात आले असून समोरच्या भागात सिमेंट,वीटा आणि स्टील चा वापर करण्यात आला आहे. मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिण भारतीय गोपुरांसारखे असून त्याच्या दोन्ही बाजूंनी बौध्द स्थापत्य शैलीतील स्तंभ आहेत. मंदिराचे दर्शनी तीन छत राजपूत मुघल शैलीतील असून त्यावर रामकृष्ण परमहंस यांच्या प.बंगाल मधील कमरपुकुर या जन्मगावातील छप्परांच्या छताचा आभास पहायला मिळतो.
#कोलकाता के बेलूर मठ में लोगों को संबोधित करते हुए PM श्री @narendramodi जी ने स्वामी विवेकानंद जयंती की शुभकामनाएं दीं।
उन्होंने कहा कि देशवासियों के लिए बेलूर मठ की पवित्र भूमि पर आना किसी तीर्थयात्रा से कम नहीं है,लेकिन मेरे लिए तो हमेशा से ये घर आने जैसा ही है @PMOIndia pic.twitter.com/2wvPiSgZiP
— Dr Harsh Vardhan (Modi Ka Pariwar) (@drharshvardhan) January 12, 2020
भारतीय वास्तुशास्त्रातील एकात्मता
हे मंदिर बारकाईने पाहिल्यावर भारतातील जगप्रसिद्ध वस्तुंची झलक फ्हायला मिळते. नट मंदिरातील सज्जे बाल्कनी आणि खिडक्या राजस्थानातील राजवाड़े आणि फत्तेपुर सिकरी येथील मुघल कालीन वास्तु कलेचा प्रभाव दर्शवितात. गर्भ मंदिराच्या चारही बाजूंनी प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग असून त्यावर बौद्ध चैत्य आणि ख्रिश्चन चर्च चा प्रभाव स्पष्टपणे पडलेला दिसून येतो.
मंदिरा बाहेर अर्ध वृत्ताकार शीर्षावर नवग्रहांच्या जाळीदार मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सर्वोच्च स्थानी सुवर्ण कलश ठेवलेला असून त्याच्या खाली पूर्ण विकसित कमलपुष्प पहायला मिळते. मंदिराच्या लहान मोठ्या सर्व घुमटांवर इस्लामी, रजपूत, बंगाल टेराकोटा आणि लिंगराज मंदिराच्या वास्तु कलेचा प्रभाव पडलेला दिसून येतो.
मंदिराच्या पूर्व पश्चिम दिशांना प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन खांब आहेत. हे खांब ग्वालियरच्या किल्ल्यातील मानमंदिराच्या सुरुचिपूर्ण प्रवेशद्वारप्रमाणे केलेले आहेत. यश आणि शक्ती देणार्या श्री गणेश आणि हनुमानजी यांच्या प्रतिमा त्यावर कोरलेल्या आहेत.
बेलूर मठात सर्वाधिक प्रेक्षणीय आहे ती श्रीरामकृष्ण यांची पूर्णाकृती संगमरवरी मूर्ती. डमरूच्या आकाराच्या पायावर शंभर उमललेल्या कमळपाकळयांवर या मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. याच डमरूच्या आकारात रामकृष्ण परमहंस यांच्या पवित्र अस्थि ठेवण्यात आलेल्या आहेत. समोर परमात्म्याचे प्रतिक असलेले हंसाचे डौलदार देखने प्रतिक लक्ष्यवेधी आहे.
कोलकत्याचे विख्यात मुर्तीकार स्वर्गीय गोपेश्वर पाल यांनी ही मूर्ती घडविली असून या मंदिराची कल्पना व सजावट स्वर्गीय नंदलाल बोस यांनी केलेली आहे. या मंदिरांतील देवतांवरील छत्र, मंदिराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या म्यानमार (ब्रह्मदेश) येथून आणलेल्या विशिष्ट सागवानी लाकडा पासून तयार करण्यात आलेले आहेत.
स्वामी विवेकानंद मंदिर
जगभरातील कोट्यवधी लोकांचा आदर्श असणार्या स्वामी विवेकानंद यांचे मंदिर बेलूर मठात आहे. या ठिकाणी स्वामींचे वास्तव्य होते.त्यांच्या स्पर्शाने इथला अणुरेणू प्रभावित झाल्याचा अनुभव येतो. ४ जुलाई १९०२ या दिवशी स्वामीजी याच ठिकाणी समाधिस्त झाले होते.त्याच जागेवर सुमारे २२ वर्षांनी त्यांचे जगातले पहिले मंदिर तयार झाले.२८ जानेवारी १९२४ या दिवशी यामंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या मंदिरातील वरच्या मजल्यावर बंगाली लिपीतील ॐ हे अक्षर तयार केलेले आहे.या ठिकाणी बसून भाविक आणि पर्यटक मन:शांतीचा अनुभव घेतात.
मंदिराच्या बाजूला बेलाचे झाड आहे.या झाडाखाली खाट टाकुन स्वामीजी बसत असत आणि शिष्य, भाविक, देशी आणि परदेशी पाहुणे यांच्याशी संवाद साधत असत. अनेक चर्चा, विविध योजनांचा शुभारंभ याच बेलाच्या झाडाखाली झालेला आहे. अनेक ज्ञात अज्ञात गोष्टींचे हे झाड साक्षीदार आहे. बेलाच्या या झाडाजवळच स्वामीनी स्वत: निर्देशित केलेल्या जागेवर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्याच जागेवर स्वामींचे मंदिर उभारण्यात आले आहे. बेलूर मठातील आणखी एक महत्वाचे आकर्षण म्हणजे सारदा देवी यांचे मंदिर.२१ डिसेंबर १९२१ या दिवशी हे मंदिराचे लोकार्पण करण्यात आले त्याच प्रमाणे रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे पहिले अध्यक्ष स्वामी ब्रह्मानंद यांचे समाधी मंदिर ७ फेब्रुवारी १९२४ रोजी समर्पित करण्यात आले.
जानिए प्रसिद्ध बेलूर मठ के बारे में जिसकी स्थापना स्वामी विवेकानंद ने की थी।#SwamiVivekanandaJayanti #SwamiVivekanandJayanti pic.twitter.com/hB4YnbQfj8
— WeYo News (@WeYoNews) January 12, 2021
रामकृष्ण संग्रहालय
बेलूर मठात आल्यानंतर आवर्जुन पहावे ते इथले रामकृष्ण संग्रहालय. रामकृष्ण परमहंस, सारदा देवी, स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या काही शिष्यांनी त्यांच्या हयातित वेळोवेळी वापरलेल्या वस्तु या संग्रहालयात काळजीपूर्वक जतन करण्यात आल्या आहेत. स्वामी विवेकानंद वापरत असत तो सुप्रसिद्ध ओव्हरकोट, भगिनी निवेदिता यांच्या वापरातील टेबल, खुद्द रामकृष्ण आणि सारदा देवी यांच्या वापरातील वस्तु पाहून माणूस रोमांचित होतो. सगळ्या बेलूर मठात प्रवेश केल्या पासून बाहेर पड़े पर्यंत आपण स्वामींच्या सहवासात असल्याचा अदभुत अनुभव येतो.
बेलूर मठातील दर्शन वेळा : सकाळी ८ ते 11 दुपारी ४ ते ५.४५
संपर्क : बेलूर मठ,बेलूर, हावरा,प.बंगाल ७११२०२
दूरध्वनी -०३३-२६५४११४४
– विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Swami Vivekanand Kolkata Belur Math by Vijay Golesar