मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईसह रत्नागिरी, रायगड, अलिबाग, सिंधुदुर्ग तसेच कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे नवनीत्यानंद महाराज (मोडक महाराज) यांचे आज सकाळी पुणे-सातारा महामार्गावर भीषण कार अपघातामध्ये निधन झाले. त्यांचे राज्यभरात मोठ्या संख्येने शिष्य, अनुयायी असून, त्यांच्या निधनामुळे शिष्यांना धक्का बसला आहे.
कल्याण मठात शेजारती झाल्यानंतर येथून मोडक महाराज काल (ता.१८) रात्री उशिरा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी निघाले होते. त्यापूर्वी ते काशी येथून कल्याण येथे आले होते. पुणे-सातारा रस्त्यावर त्यांची गाडी दुभाजकाला धडकून अपघात झाला. सततच्या प्रवासामुळे चालकाला झोप अनावर झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यांचे वाहन दुभाजकाला धडकल्याने हा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तर वाहन चालक अत्यवस्थ असून त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत.
मोडक महाराज यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच राज्यभरातील भक्तगण कल्याणच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात मोडक महाराज यांनी श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना केली होती. त्यांचे राज्यभरात अनुयायी सुद्धा आहेत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘कल्याण पश्चिम सदगुरु श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट चे संस्थापक व अध्यक्ष गुरुवर्य पुज्य सदगुरु श्री नवनीत्यानंद मोडक महाराज यांचे प्रवासादरम्यान कोल्हापूर येथे अपघाती निधन झाले. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.’ अशा शब्दांमध्ये भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराजांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कल्याण येथील श्री स्वामी समर्थ मठात ठेवले जाणार आहे. ही बातमी समजताच राज्यभरातील भक्तगण कल्याणच्या दिशेने रवाना झाले आहेत.
Swami Samartha Modak Maharaj Accident Death