नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री स्वामी समर्थ सेवामार्ग, समर्थ गुरुपीठ आणि श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित जागतिक कृषी महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. डोंगरे वसतीगृह मैदानावरील पाच एकर विस्तीर्ण परिसरात हा महोत्सव सुरू आहे. येत्या २९ जानेवारीपर्यंत त्याचा लाभ घेता याणार आहे.
25 ते 29 जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या या शेतकरी हिताच्या भव्य कार्यक्रमाच्या मुख्य सोहळ्याआधी रामकुंड परिसरातून निवडक महिला पुरुष सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत कृषिदिंडी काढण्यात आली. या दिंडीतील पालखीतील श्री स्वामी समर्थ महाराज व कृषी ग्रंथाचे पूजन आबासाहेब मोरे व मान्यवर सेवेकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. ही दिंडी डोंगरे वसतिगृह मैदानात येताच सकाळी साडेदहा वाजता मुख्य सोहळा सुरू झालाय या सोहळ्यात गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे, राज्याचे महसूल व पशुसवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमाताई हिरे, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, पशू संवर्धन अधिकारी विष्णू गर्जे यांचेसह अनेक अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य सोहळ्यासाठी 30 x 60 फुटाचे भव्य व्यासपीठ असून 150 x 100 फुटाचा शामियाना उभारण्यात आला आहे. याच मंडपात पाच दिवस विविध चर्चासत्र आयोजित करण्यात येत आहेत. याशिवाय विविध कृषी, सेंद्रिय उत्पादक, विक्रेते यांचेसाठी 350 स्टॉल उपलब्ध आहेत. बारा बलुतेदार गाव, मराठी अस्मिता, संस्कृती, पर्यावरण पूरक शेतीचे मॉडेल, युवा, विवाह मेळावे यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. पार्किंग साठी जवळपास तीन एकर जागा आहे.
भव्य प्रवेशद्वारावर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि भरडधान्य या दोन महत्वाच्या गोष्टी येणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेत भरतील अश्या पद्धतीने प्रदर्शित करण्यात येतील. सेवामार्गाचे कृषी अभियान प्रमुख आबासाहेब मोरे म्हणाले की, ” लाखो शेतकरी, सेवेकरी, भाविक, विद्यार्थी, कृषी अभ्यासक, संशोधक, व्यापारी, संस्था, लहान मोठे उद्योजक हे वर्षभर या महोत्सवाची वाट पाहत असतात. नाशिक महानगरात होणाऱ्या या जागतिक कृषी महोत्सवात पाच दिवसात १० लाखाहून अधिक व्यक्ती हजेरी लावतील.
या वर्षी महोत्सवात खास आकर्षण आहे भरडधान्य. भरडधान्यास आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्व आहेच पण जनावरांचा चारा, पर्यावरण, शेतकऱ्यांची उपजीविका या दृष्टीने सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. याबाबतीत लागवड ते बाजारपेठ असे सर्व मार्गदर्शन मिळत आहे. यासह भारतीय शेती, दुर्मिळ वनोषधी, अत्याधुनिक शेती ज्ञान, तंत्रज्ञान, स्वयंरोजगार, शेतकरी वधुवर परिचय, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी पर्यटन, आरोग्य व व्यसनमुक्ती, गावरान बी बियाणं, प्राचीन भारतीय कृषी विज्ञान, बारा बलुतेदार गाव, कृषी प्रबोधन सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी व खाद्य संस्कृती असे विविध विषयांवर मार्गदर्शन, प्रबोधन करणारे विभाग येथे आहेत.
संशोधक, शेतकरी, विद्यार्थी यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कृषीमाऊली पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणाही आयोजकांनी केली आहे. 25 जानेवारी रोजी दुपारी विषमुक्त शेती, भरडधान्य यावर चर्चासत्र झाले. 26 जानेवारी रोजी युवा महोत्सव आणि पशुगोवंश चर्चासत्र संपन्न झाले. 27 जानेवारी रोजी स्वयंरोजगार व शेतकरी वधुवर मेळावा होत आहे. 28 जानेवारी रोजी माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण, दुर्ग संवर्धन परिषद, 29 जानेवारी रोजी आरोग्य महामेळा तसेच सरपंच, ग्रामसेवक मांदियाळीने महोत्सवाची सांगता होणार आहे. या पाच दिवसीय कार्यक्रमात प्रवेश मोफत असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी, नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही आबासाहेब मोरे यांनी केले आहे.
Swami Samartha Agriculture Expo in Nashik