नाशिक – राष्ट्रीय स्वच्छ सर्वेक्षणातील विजेत्या शहरांना आज राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यंदाही मध्यप्रदेशातील इंदूर शहराने पहिला क्रमांक पटकावला आहे. मात्र, नाशिक महापालिकेचा क्रमांक कितवा आहे असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. त्याचे उत्तर मिळाले आहे. राष्ट्रीय स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये नाशिक महापालिका देशात १७ व्या क्रमांकावर आहे. तशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.
आयुक्त जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाच्या वतीने देशातील शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२१ घेण्यात आले. या स्पर्धेमध्ये नाशिक महानगर पालिकेने देशात १७ वा तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक मिळविला आहे. ही स्पर्धा एकूण तीन निकषांमध्ये घेण्यात आली. त्यात १.सर्विस लेवल प्रोग्रेस (SLP) २. सर्टीफिकेशन ३. प्रत्यक्ष पाहणी व नागरिकांच्या प्रतिक्रिया यांचा समावेश आहे.
सदर तीन घटकांमध्ये नाशिक मनपाने मिळवलेले गुण असे
1. सर्विस लेवल प्रोग्रेस (documentation) – 2080.27 (2400)
2. सर्टिफिकेशन – 700 (1800)
3. प्रत्यक्ष पाहणी व नागरिकांच्या प्रतिक्रिया -1467.78 (1800)
एकूण गुण – 4248.05
राज्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या नवी मुंबई शहराने मिळविलेले गुण असे
1. सर्विस लेवल प्रोग्रेस (documentation) -2113 (2400)
2. सर्टिफिकेशन -1600 (1800)
3. प्रत्यक्ष पाहणी व नागरिकांच्या प्रतिक्रिया -1595 (1800)
एकूण गुण – 5307.68
सर्टिफिकेशन, प्रत्यक्ष पाहणी व नागरिकांच्या प्रतिक्रिया या दोन घटकांमध्ये कमी गुण मिळाल्याने देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये नाशिकचा समावेश होऊ शकला नाही. तसेच पुढील वर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये या घटकांवर भर देऊन पहिल्या पाचमध्ये येण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले आहे.