प्रथमच एकत्र पहा – स्वातंत्र्यवीरांची प्रेरणादायी स्मारके!
२६ फेब्रुवारी म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुण्यस्मरण दिवस!
विनायक दामोदर सावरकर ज्यांना सगळे तात्यासाहेब म्हणत प्रखर देशभक्त होते. ते कवी होते, लेखक होते, समाजसुधारक होते. ‘हिंदुत्व’ या शब्दाचे जनक होते.
मुख्य म्हणजे ते नाशिककर होते. नाशिक जवळच्या भगूर या लहानशा गावात १८८३ मध्ये त्यांचा जन्म झाला. आणि याच गावात त्यांची जडणघडण झाली. १९०४ मध्ये त्यांनी नाशिक येथे अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली.
महाराष्ट्र सरकारने भगूर येथील सावरकर यांच्या जन्मस्थान असलेल्या वाड्याचे प्रेरणादायी स्मारकात रुपांतर केले आहे.
इंग्रज राजवटीशी लढा दिल्यामुळे सावरकरांना ७ एप्रिल १९११ रोजी दोन जन्मठेपांची शिक्षा झाल्याचे सर्वविदीत आहे. ५० वर्षांची काळ्या पाण्याची ही सजा भोगण्यासाठी त्यांना अंदमान निकोबार बेटावरील निर्जन ठिकाणी असलेल्या अत्यंत भक्कम असलेल्या तुरुंगवासात डांबून ठेवण्यात आले. खरं तर तिथून जिवंत बाहेर येणं अशक्य होतं. सावरकरांनी येथे ४जुलै १९११ ते २१ मे १९२१ अशी १० वर्षे शिक्षा भोगली. ‘काळे पाणी’ या त्यांच्या आत्मचरित्रांत त्यांनी ते सविस्तर लिहिले आहे.
भारत सरकारने अंदमान येथील सेल्युलर जेलच्या त्या कोठडीचे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर स्मारकात रुपांतर केले आहे. दरवर्षी लाखो सावरकरप्रेमी या स्मारकाला भेट देतात.
त्याच प्रमाणे अंदमानातील पोर्ट ब्लेअर विमानतळाला केंद्र सरकारने विनायक दामोदर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव दिले आहे.अंदमानातून सुटल्यावर सावरकरांना अनेक वर्षे रत्नागिरी येथे स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते. येथे त्यांनी श्री पतित पावन मंदिराची स्थापना केली. आजही या मंदिराकडे सावरकरांचे चालते बोलते स्मारक म्हणून पाहिले जाते.
रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक अत्यंत काळजीपूर्वक जतन करण्यात आले आहे. सावरकरांचे अनेक फोटो, त्यांचे साहित्य, लिखाण, त्याच प्रमाणे त्यांच्या नित्याच्या वापरातील अनेक वस्तू पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक या स्मारकाला भेट देतात.
१९८३ साली सावरकरांच्या जन्मशताब्दी निमित्त भारत सरकारने त्यांचे एक तिकिटं देखील प्रसिद्ध केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ही सगळी स्मारके प्रेरणादायी आहेत. विजय गोळेसर यांनी या व्हिडिओत सावरकरांच्या या सर्व स्मारकांचा प्रथमच एकत्र परिचय करून दिला आहे.
विजय गोळेसर
मोबाइल ९४२२७६५२२७
Svatanrtryaveer Savarkar Memorials Video