नाशिक – येथील दि सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. इमारत बांधकामासाठी तारण गहाण केलेल्या सदनिका परस्पर विक्री करण्यात आली आहे. पतसंस्थेची ३३ लाख रुपयांची झाल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. त्याची दखल घेत सरकारवाडा पोलिसांनी २ बिल्डरांसह एका जामिनदाराला अटक केली आहे.
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात भाऊसाहेब भागूजी ढगे (रा.एमएचबी कॉलनी,सातपूर),संदिप सिताराम शिंदे (रा.घोडबाबानगर,द्वारका) आणि गोकुळ गणपत कातड – पाटील (रा.गणपतराव कातड मार्ग,गंगापूर) यांचा समावेश आहे. यातील दोन जण बिल्डर आहेत. संशयीतांचा साथीदार सचिन सदाशिव चंबुळे हा अद्याप हाती लागला नसून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
याप्रकरणी दि सुवर्णा नागरी सह.पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रमोद बाळकृष्ण बधान यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयीतांनी महापालिका हद्दीतील पिंपळगाव बहुला शिवारातील सर्व्हे नं.१८५ – १ अ,प्लॉट नं.४६,७४ ते ७६ वरील मिळकत देवश्री इस्टेट अपार्टमेंट या इमारतीचे बांधकाम केले. बांधकामासाठी दि.सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेकडून कर्ज घेतले त्यापोटी सदर सोसायटी मधील सदनिका क्रमांक १,२२ व २५ तारण गहाण केल्या. सदरच्या कर्जाची परतफेड न करता व संस्थेच्या परवानगी न घेता संबधीतांनी परस्पर सदनिकांची विक्री केली. याबाबत एचडीएफसी बँकेनेची तारण मुक्त असल्याची खातरजमा न करता नवीन कर्जदारांना कर्ज पुरवठा केल्याने ही बाब समोर आली आहे. संशयीतांनी बांधकाम व्यावसायीकांनी पतसंस्थेस ३३ लाखास गंडविल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अशोक काकवीपुरे करीत आहेत.