अलिबाग – महाराष्ट्राने अनेक संकटे पाहिली, अनेक संकटे झेलली. परंतु हा महाराष्ट्र कधी थांबला नाही. यापुढेही हा महाराष्ट्र निर्धाराने, एकजुटीने प्रत्येक संकटावर मात करून पुढे जात राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगार येथील सुवर्ण गणेश मंदिरातील सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
आज अंगारकी चतुर्थी आणि याच दिवशी दिवेआगारचे वैभव असलेल्या सुवर्ण गणेश मुखवट्याचा प्रतिष्ठापना सोहळा, म्हणूनच आजचा दिवस दिवेआगारवासियांसाठी सुवर्ण क्षण मानला जात आहे. येथील चोरीस गेलेल्या सुवर्ण गणेश मूर्तीच्या मुखवट्याच्या प्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सपत्नीक सुवर्ण गणेशाची पूजा करण्याचा मान मिळाला.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर आज हा सुवर्ण दिन आपल्या सर्वांना पाहायला मिळतो आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने कोकण आणि कोकणवासियांचा विकास अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून कोकणचा विकास साध्य करण्यासाठी हे शासन सदैव प्रयत्नशील आहे.
दिवेआगार ग्रामपंचायत व ग्रामसचिवालय कार्यालयासाठी एक कोटी रुपये निधीची घोषणा करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, फलोत्पादन योजनेचे यश हे खरंतर कोकणवासियांमुळेच पाहायला मिळाले आहे. राष्ट्रीय गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. एसटी कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. रायगडच्या भौगोलिक दृष्टीने येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक कायमस्वरूपी स्थापित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असून शासन या कामात सर्व प्रकारचे सहकार्य करीत आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये करावयाच्या मदतीबाबत एनडीआरएफच्या निकषांमध्ये काही बदल काही सुधारणा आवश्यक आहेत, त्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. रायगडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होत आहे. त्याचबरोबर फळप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
तसेच कृषी पर्यटन धोरण, समुद्रकिनाऱ्यावरील बीच शॅक, निसर्ग पर्यटन धोरण, शामराव पेजे महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद, अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा विकास, जेट्टी विकास कार्यक्रम, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, मॉडेल आश्रमशाळा, वसई-विरार- अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर, अशा विविध विकास कामांविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासक भाष्य केले.
दिवेआगार समुद्रकिनारा विकसित करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, त्याचबरोबर करोनाबाबत सावधगिरी बाळगा, काळजी घ्या. शाळा-कॉलेजेस सुरू करायचे आहेत, यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. यानुषंगाने दुसऱ्या लससाठी प्रभावी मोहीम राबवावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना यावेळी केल्या.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, सरपंच उदय बापट, सुवर्ण गणेश मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर, उपाध्यक्ष निलेश वाणी, श्रीमती सुनेत्रा पवार, श्रीमती वरदा तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदी उपस्थित होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कोकण विभागातील विकासकामांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे सहकार्य मिळत असून महा विकास आघाडीचे हे शासन राज्यातील प्रत्येक संकटात खंबीरपणे उभे राहिले आहे. करोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असून आता कोकण विभागात पर्यटनाबरोबरच शैक्षणिक विकासासाठीही उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे रायगड तसेच कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांना आवश्यक ती मदत वेळोवेळी मिळत असून येथील पर्यटन विकास, शैक्षणिक विकास त्याचबरोबर इतर विकास कामेही येत्या काळात मोठ्या प्रमाणावर विकसित होताना दिसून येतील, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मिळणारे मार्गदर्शन हे अनमोल आहे, या शब्दात त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
दि.24 मार्च 2012 रोजी सुवर्ण गणेश मंदिरातील मुखवट्याच्या चोरीनंतर या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने केलेल्या अथक प्रयत्नांची सविस्तर माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थितांना दिली व आजच्या या सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी योगदान असलेल्या सर्वांचे आभार मानले.
त्या पुढे म्हणाल्या की, सन 2012 साली सुवर्ण गणेश मुखवट्याच्या चोरीची दुर्दैवी घटना घडली. तपास सुरू झाला, काही काळ थांबला, मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्याचा तपास युद्धपातळीवर करण्यात आला. आणि आज श्री गणेशाच्या मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात येऊन आपल्या सर्वांना या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होता आले. निसर्गरम्य दिवेआगार पर्यटनाला चालना मिळाली होती, मात्र चोरीच्या या घटनेमुळे येथील पर्यटनाला ब्रेक लागला होता. परंतु आजच्या दिवसानंतर पुन्हा एकदा श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला उभारी प्राप्त होईल ती आजच्या या दिवेआगार सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळ्यामुळे.
याप्रसंगी खासदार सुनील तटकरे म्हणाले की, आजचा अंगारकीचा योग विशेष आहे. गेली 9 वर्षे दिवेआगार येथील वर्ण मुखवट्याच्या चोरीच्या घटनेनंतर येथील अंगारकी चतुर्थी उत्साहात साजरी होऊ शकत नव्हती. मात्र आजच्या या सोहळ्याने येथील नागरिकांमध्ये पूर्वीचा उत्साह पुन्हा संचारला आहे.
दिवेआगार येथील पर्यटनाला पुन्हा एकदा उभारी मिळण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी शासनाकडून आम्हाला बळ मिळत आहे असे सांगून श्रीवर्धन तालुक्याला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळाली आहे, त्यासाठी महाविकास आघाडी शासन विशेष प्रयत्नशील आहे. येत्या काही काळात सागरी महामार्गाचा विकास, कोकण विभागातील समुद्रकिनाऱ्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास अशा विविध माध्यमातून कोकणचा कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही. चिपी विमानतळामुळे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोकणातील अनेक भागात पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे पर्यटन व्यवसाय आता बहरु लागला आहे. दिवेआगर येथील साडेचार किलोमीटरचा समुद्रकिनारा विकसित केल्यास येथील पर्यटनही विकसित होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथे सन 1997 साली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी एका नारळ पोफळीच्या बागेत सुवर्ण गणेशाची मूर्ती सापडली आणि जिल्ह्यातील दिवेआगार हे ठिकाण प्रसिद्धी झोतात आले. सुवर्ण गणेश पाहण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी सुरू झाल्यामुळे येथील पर्यटन व्यवसायालाही चालना मिळाली. मात्र सन 2012 साली येथील सुवर्ण गणेश मूर्तीच्या सोन्याच्या मुखवट्याची चोरी झाली आणि पर्यटनाच्या माध्यमातून प्राप्त झालेले येथील वैभव लयास गेले. तब्बल 9 वर्षांचा काळ लोटल्यानंतर रायगड पोलीस, विविध शासकीय यंत्रणा आणि स्थानिक पत्रकार या सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळे आज मंगळवार, दि.23 नोव्हेंबर 2021 रोजी अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने शासकीय अधिकाऱ्यांच्या, पोलीस प्रशासनाच्या, स्थानिक पत्रकार आणि नागरिकांच्या साक्षीने सुवर्ण गणेशाच्या सुवर्ण गणेश मुखवट्याचा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. यामुळे पुन्हा एकदा दिवेआगार पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. येथे चोरीसारखी घटना पुन्हा घडू नये म्हणून या ठिकाणी रायगड पोलीस दलामार्फत पोलीस चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे. या नूतन पोलीस चौकीचे उद्घाटन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले, तसेच पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून 2 कोटी रुपये खर्च करून नळपाणी योजना मंजूर करण्यात आली असून यावेळी या योजनेचे देखील अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे जेष्ठ प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या अभंगवाणीने करण्यात आली. प्रास्ताविक दिवेआगार चे सरपंच उदय बापट यांनी केले तर सूत्रसंचालन सुधीर शेठ यांनी केले.
सुवर्ण गणेश मूर्तीच्या मुखवट्याची चोरी झाल्यापासून ते त्या मुखवट्याची पुन्हा प्रतिष्ठापना होईपर्यंत ज्या व्यक्तींनी आपले प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या योगदान दिले, त्या सन्मानमूर्तींचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. यामध्ये सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री.कांबळे, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल गायकवाड, संजय शुक्ला, संजय शितोळे, ॲड. प्रसाद पाटील, ॲड.ए.सी.गावंड, ॲड.भूषण साळवी, ॲड.विलास नाईक, श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, श्रीवर्धन तहसिलदार सचिन गोसावी,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पु.गाडगीळ ज्वेलर्स, पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके, महेंद्र शेलार, विराज काशिनाथ पाटील, श्रीमती अनिता घडशी, श्रीमती उषा भगत, माया हिऱ्या चौगुले, सचिन निजामपूर, सचिन खैरनार, संजय खोपकर, रत्नाकर शिरकर, उल्हास खोपकर, देवेंद्र नार्वेकर, परिमल भावे, पत्रकार वैभव तोडणकर आदिंचा सन्मान करण्यात आला.