नवी दिल्ली – जर्मनीची प्रसिद्ध कार कंपनी फोक्सवॅगन (Volkswagen) भारतीय बाजारात २३ सप्टेंबरला Volkswagen Taigun या नव्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे अनावरण करणार आहे. अनावरण करण्यापूर्वीच ग्राहकांकडून जोरदार प्रतिक्रिया मिळत आहेत. कंपनीने १८ ऑगस्टला या कारचे बुकिंग सुरू केले होते. फॉक्सवॅगन टाइगुनच्या दहा हजारांहून अधिक ऑर्डर मिळाल्याचे वृत्त carandbike ने दिले आहे.
फॉक्सवॅगन मंडळाच्या विक्री विभागाचे आणि जाहिरात तसेच वितरण विभागाचे क्लाउस झेल्मर यांनी याबाबत माहिती दिली. भारतात दर महिन्यात पाच ते सहा हजार टाइगुनची विक्री करण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यापूर्वीच आम्हाला दहा हजार प्री-बुकिंग मिळाल्या आहेत. एसयूव्हीच्या टॉप-स्पेक जीटी व्हेरिएंटमध्ये एलइडी हेडलाइट्स, एलइडी डे-टाइम रनिंग लँप, १७ इंचाचा ड्युअल टोन अलॉय व्हील पाहायला मिळणार आहे. कारच्या इंटिरिअरमध्ये दहा इंचाची टचस्क्रीन डिस्प्ले आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टरसारखे फिचर्स पाहायला मिळणार आहेत. सुरक्षेसाठी एसयूव्हीमधील सर्व प्रवाशांसाठी ३ पॉइंट सीटबेल्ट, आसोफिक्स माउंट, रिअर पार्किंग कॅमेरा, एबीएस आणि ६ एअरबॅग मिळणार आहे. ह्युंदई क्रेटा आणि किआ सेल्टोससारख्या वाहनांशी या कारची स्पर्धा होणार आहे. या कारला दोन पद्धतीचे इंजिन आहेत. १ लिटर टीएसआय आणि १.५ लिटर टीएसआय असे पेट्रोल इंजिनचे पर्याय आहेत.