इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, तर दुसरीकडे येत्या २० नोव्हेंबरला मतदान असल्याने प्रशासन कामाला लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामात मोठ्या संख्येने शिक्षक निवडणूक ड्युटीवर अहेत. त्यामुळे अनेक शाळांना १८, १९ आणि २० नोव्हेंबरला शाळा चालविणे अशक्य आहे. त्यामुळे ज्या शाळांना शाळा भरवणे कठीण आहे, त्या शाळांना सुट्टी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या सचिवांकडून सर्व शाळांना तसे विनंती पत्र पाठवण्यात आले आहे; पण शाळेला सुट्टी देण्याबाबतचा निर्णय त्या त्या शाळेला घ्यायचा आहे. अर्थात ज्या शाळांकडून सुट्टी जाहीर केली जाणार त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना १८,१९ आणि २० नोव्हेंबरची सुट्टी तर मिळणार आहेच; यासोबत १७ नोव्हेंबरला रविवार असल्याने सलग चार सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. निवडणूक कर्तव्यावर अनेक शिक्षक असल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाळा या तीन दिवस भरवणे कठीण आहे. शिवाय मतदान केंद्रसुद्धा अनेक शाळाच आहेत. या सगळ्याचा विचार करून १८, १९ आणि २० नोव्हेंबर या तीन दिवशी ज्या शाळांना शाळा सुरू ठेवणे शक्य नसेल, त्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सचिवांनी १८, १९,२० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीत शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यांमुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याबाबत सूचना द्या, असे विनंती पत्र राज्य सरकारच्या शिक्षण आयुक्तांनी सर्व शाळांना पाठवले आहे.