इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – निलंबित सनदी अधिकारी पूजा सिंघल आणि तिचे चार्टर्ड अकाउंटंट सुमन कुमार यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. ईडी कोर्टाने पूजा सिंघलच्या कोठडीची मुदत आणखी पाच दिवसांनी वाढविली आहे, तर दुसरीकडे सीए सुमन कुमार यालाही तुरुंगात पाठविले आहे.
रिमांडवरील चर्चेदरम्यान ईडीचे विशेष सरकारी वकील बीएमपी सिंग यांनी सांगितले की, पूजा सिंघल ही पल्स हॉस्पिटलबाबत काहीही बोलायला तयार नाही. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून सहकार्य मिळत नाही. तर पूजा सिंघलचे वकील उच्च न्यायालयाचे वकील विश्वजित मुखर्जी यांनी सांगितले की, त्यांच्या खटल्याची मीडिया ट्रायल सुरू आहे. पूजा आजारी आहे, ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे, त्यामुळे तिला रिमांड देऊ नये. यावर ईडीकडून सांगण्यात आले की, संपूर्ण देश या प्रकरणाकडे लक्ष देत आहे, त्यामुळे या प्रकरणाबाबत कोणीही उदासीनता दाखवू नये.
फक्त आयएएस पूजा सिंघल आणि तिच्या चार्टर्ड अकाउंटंटची रिमांडवर चौकशी करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून पाकूर आणि दुमका येथील जिल्हा खनन अधिकाऱ्यांची समोरासमोर चौकशी सुरू असताना ईडीचे अधिकारीही चौकशीत सहभाग घेणार आहेत. साहिबगंजमधील अवैध खाणकाम आणि अवैध वाहतुकीच्या मुद्द्यावरही त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
६ मेपासून ईडीची जोरदार कारवाई सुरू आहे. निलंबित आयएएस पूजा सिंघल आणि तिच्या सहकाऱ्यांच्या पाच राज्यांतील २० हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. ज्यामध्ये त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटकडून १९.३१ कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले. चार्टर्ड अकाउंटंट सुमन कुमार यांना ८ मे रोजी अटक करण्यात आली होती. निलंबित आयएएस पूजा सिंघलला दोन दिवसांच्या चौकशीनंतर ११ मे रोजी ईडीने अटक केली होती. सुमन कुमार ९ मे पासून आणि पूजा सिंघल १२ मे पासून ईडी रिमांडवर आहेत.