इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीएचे उमेदवार व महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना मतदान द्यावे यासाठी उध्दव ठाकरे व शरद पवार यांना फोन लावले होते. त्यावर आज त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, उध्दव ठाकरे यांनी सर्वांशी चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ असे सांगितले तर शरद पवार यांनी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन उमेदवार ठरवल्याचे सांगत त्यांच्यासोबत जाऊ असे सांगितले. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र वेगळीच भूमिका माडंली. त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांना अशा पद्धतीने पाठिंबा मागण्याचा खरंच नैतिक अधिकार आहे का?
त्या पुढे म्हणाल्या की, पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन शिवसेनेने कायम मराठी माणूस आणि मराठी अस्मितेला प्राधान्यक्रम दिला. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार झाल्या तेव्हा त्या जरी काँग्रेसच्या असल्या तरी महाराष्ट्राच्या लेकीला हा सन्मान मिळत असेल तर शिवसेना राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राची अस्मिता म्हणून पाठिंबा देईल हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी जाहीर केले होते.
मात्र आता महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना मुंबईचे मतदार म्हणून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा द्यावा ही फडणवीसनची अपेक्षा हा निगरगट्टापणाचा कहर आहे. प्रतिभाताईंना पाठिंबा दिला कारण त्यांनी आमचा पक्ष फोडला नव्हता.देवेंद्रजी, तुम्ही या राज्यातले दोन पक्ष फोडले. मूळ भाजपाई नेत्यांना बाजूला सारून भ्रष्टाचारी नेत्यांना ब्लॅकमेल करत स्वतःच्या पक्षात घेतलं तुम्हाला अशा पद्धतीने पाठिंबा मागण्याचा खरंच नैतिक अधिकार आहे का? निश्चितपणे महाविकास आघाडीचा संख्याबळ हे कमी असेल मात्र आमचं नैतिक बळ नक्कीच काकणभर अधिक आहे.