इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापनदिन पिंपरी चिंचवड येथे आज संपन्न झाला. यावेळी आयोजित मनसैनिकांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट कुंभमेळाव्याच्या पवित्र स्थानावर भाष्य करत खिल्ली उडवली. त्यानंतर त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज ठाकरे यांचे त्यांनी कौतुक केले आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, अधूनमधून राज ठाकरे खरं बोलतात. कुंभमेळ्याच्या संदर्भाने देशातील नद्यांचे पाणी आणि स्वच्छता प्रकल्पाबद्दल त्यांनी मांडलेली भूमिका दुर्दैवाने खरी आहे. ती प्रबोधनकारांच्या डोळस हिंदुत्वाशी सुसंगत आहे. तेव्हा त्याचा विपर्यास करण्यापेक्षा मोदी भक्तांनी आत्मचिंतन करावे.
काय म्हणाले राज ठाकरे
मध्यंतरी मुंबईतल्या मेळाव्यात काही पदाधिकारी हजर नव्हते. त्या गैरहजर पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यातल्या काहींनी कारणं सांगितली की कुंभ मेळ्याला गेलो होतो. मी त्यांना म्हणलं इतकी पापं करता कशाला की जी धुवायला गंगेत जावं लागतं. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून गंगेचं पाणी घेऊन आले. इतक्या लोकांनी अंघोळ केल्यावर गंगा कशी स्वच्छ राहील. असलं पाणी कोण पिणार? श्रद्धा समजू शकतो पण या देशातील एक नदी स्वच्छ नाही, नदीला आपण माता म्हणतो पण त्या नदीला आपण स्वच्छ ठेवत नाही. राजीव गांधी असल्यापासून गंगा साफ होणार असं ऐकतोय पण पुढे काय झालं? अंधश्रद्धेतून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी बाहेर यावं असे सांगितले.