मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याने फार लवकर सत्य बाहेर आले असल्याचा सांगत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चिमटा काढला. कडू यांचे वक्तव्ये म्हणजे फुटलेले आमदार यांचा प्रेमविवाहानंतर प्रेमभंग झाल्याचे दिसत आहे. आ. कडू आणि इतर आमदार हे हिंदुत्वाच्या किंवा उध्दव ठाकरे यांच्यावर नाराज होऊन गेले नव्हते तर सत्तेतील वरचे पद मिळविण्यासाठी गेले होते. हे सत्य आता लोकांसमोर येत असल्याचे अंधारे यांनी सांगितले.
राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारला समर्थन देणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील आमदार बच्चू कडू यांचा आमदार रवी राणा यांच्याशी संघर्ष टोकाला गेला आहे. समर्थनासाठी खोके घेतल्याचा आरोप राणा यांनी केला असून या आरोपांमुळे बच्चू कडू दुखावले गेले आहेत. त्यानंतर कडू यांनी राणा यांनी १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करावे, अन्यथा त्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. आठ ते दहा आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे. बुधवारी नागपुरात पत्रकार परिषद घेत राणा यांच्या आरोपावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेसमोर येऊन स्पष्ट करण्याची मागणी केली.
पुढे बोलताना कडू म्हणाले, पन्नास खोक्यांचा आरोप विरोधकांकडून होत असताना आम्ही दुर्लक्ष केले. पण सत्तेत सहभागी असलेले आमदार रवी राणा यांच्याकडून चुकीचे आरोप झाल्याने जनतेत चुकीचा संदेश गेला आहे. राणांच्या आरोपामुळे शिंदे सरकारला पाठिंबा देणारे इतर आमदारही दुखावले आहेत. प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांशीही आपण चर्चा करू. १ नोव्हेंबरपर्यंत राणा यांनी माफी मागितली नाही किंवा आरोपाशी संबंधित पुरावे दिले नाहीत तर वेगळा निर्णय घेऊ व बच्चू कडू स्टाईलनेच आरोपांना उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याच आ. कडू यांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी चिमटा काढला आहे.