पुणे – अनेक दिवसांपासून राजकीय संक्रमणाच्या काळातून जाणार्या काँग्रेसची द्विधा मनस्थिती आणि निर्णय न घेण्याची स्थिती पाहून पक्षनिष्ठ जुन्या दिग्गजांचा संयम सुटत चालला आहे. काँग्रेसमध्ये संवाद, चर्चा आणि बैठकांची परंपरा संपल्याबाबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच केलेले वक्तव्य नेत्यांचा संयम सुटत असल्याचे संकेत आहेत. सुशीलकुमार शिंदे पक्षश्रेष्ठींच्या निकटवर्तीय असल्याने त्यांच्याकडून पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणे महत्त्वाचे मानले जात आहे.
राष्ट्रीय राजकारणावर काँग्रेसची पकड सैल होत असल्याबाबतची चलबिचल सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतीच पुणे येथे व्यक्त केली आहे. आत्मचिंतन, चर्चा-वाद, बैठक घेण्याची काँग्रेसची परंपरा आज संपुष्टात आली आहे. पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आमच्या धोरणात त्रुटी असून शकतात. त्या सुधारण्यासाठी संवाद आणि आत्मनिरीक्षणाची गरज आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय
पक्षाच्या सध्याच्या दशा-दिशांवर शिंदे यांचे वक्तव्य काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. शिंदे हे गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दोन सरकारमध्ये ते गृहमंत्री तसेच लोकसभेत काँग्रेसचे संसदीय दलाच्या नेतेपदावर विराजमान होते. गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय असल्यानेच त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्याची चर्चा अधूनमधून सुरू असते. सध्याच्या परिस्थितीवर निर्माण होणार्या गंभीर आव्हानांवर पक्षनेतृत्वाची द्विधा मनस्थिती जुन्या नेत्यांना रूचत नाहीये. काँग्रेसमधील असंतोषाबाबत बोलणार्या जी -२३ समुहानंतर पक्षाच्या परिस्थितीतवर सार्वजनिक वक्तव्य करणारे शिंदे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळेच पक्षश्रेष्ठींना त्यांचे वक्तव्य किती भावते हे आगामी काळातच ठरेल.