नवी दिल्ली – कुस्तीपटू सागर धनखड हत्येप्रकरणी कुस्तीमध्ये दोन ऑलिम्पिक पदकविजेता असलेला पहिलवान सुशील कुमार याला दिल्ली पोलीसांनी शनिवारी पंजाबमध्ये अटक केली आहे. सुशील कुमार गेले काही दिवस पोलीसांन चकमा देत होता. तो रोज ठिकाणे बदलत असल्यामुळे पोलीसही चक्रावले होते. अखेर पोलीसांना त्याला पकडण्यात यश आले.
हत्या केल्यानंतर सुशील कुमार काही तास एका ठिकाणी राहिल्यानंतर दुस-या जागी जात होता. या दरम्यान तो काही नातेवाईकांच्या मोबाईला वापर करत असल्याचे पोलिसांना कळाले होते. तो हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून निघून पंजाबला पोहोचला असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. गुरुवारी दिवसा आणि रात्री त्याचे लोकेशन पंजाबच्या काही जिल्ह्यात पोलीसांना दिसले होते. उत्तर पश्चिम जिल्ह्यातील काही पथके सुशीलला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. एका दिवसापूर्वी सुशील कुमारचे लोकेशन बहादूरगढमध्ये दिसले होते. त्यामुळे पोलीसांनी या सर्वाचा शोध घेत त्याला अखेर अटक केली.
हत्येचे सीसीटीव्ही फुटेज आले होते समोर
सुशीलकुमार याला अटक करण्यापूर्वी त्याच्या घटनेचे छत्रसाल स्टेडिअममधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यातून सुशील कुमार आणि त्याच्या टोळक्याची क्रूरता समोर आली आहे. यामध्ये सुशील कुमार याच्यासह २० ते २५ पहिलवान आणि असौदा येथील टवाळखोरांची टोळी सागर धनखडसह इतर दोघांना जनावरांसारखी मारहाण करतानाचे दृश्य कैद झाले आहे. सर्व संशियत सागरला लाथा-बुक्क्या, काठ्या, बॅट, हॉकीच्या बॅटने मारहाण करताना सीसीटीव्हीत व्हिडिओमध्ये दिसत आहेत. सागर आणि इतर दोन पीडितांना सुशील कुमार हॉकीच्या बॅटने मारहाण करताना दिसत आहे. सर्व पहिलवान आणि टवाळखोरांची टोळी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.