राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन
- सावळीराम तिदमे (मो. 8007975760)
खान्देशातील जळगाव शहरातील श्री. सतीश जैन नामक युवकाच्या अंतरंगात माऊली माय मराठीच्या सेवेची ज्योत निर्माण झाली. ६ मार्च २००४ रोजी या अमराठी युवकाने सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाची जळगावात स्थापना केली. राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाने अनेक बाबी घडविल्या आहेत. याच संमेलनाविषयी आपण आज जाणून घेणार आहोत….
मंडळ अनेक स्थापन होतात व काल प्रवाहात नष्ट होतात. पण या जैन नामक अवलियाने चमत्कार केला. सरकारी अनुदान, राजकारण्यांचा आधार न घेता जिल्हा, विभाग, राज्यस्तरीय अशी सतरा सूर्योदय मराठी साहित्य संमेलने भव्य दिव्य स्वरूपात यशस्वी केली. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, या साने गुरुजींच्या प्रार्थनेने प्रेरित झालेल्या युवकाने मायमराठीच्या समर्पित सेवेसाठी अक्षरशः जीवन समर्पित केले. स्वतःची पारिवारिक स्थिती जेमतेम, उत्पन्नाचे स्रोत क्षणीक व इवलेसे.
सगळ्या प्रतिकूलतांचा समर्थपणे सामना करून अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेच्या सर्वांगीण उत्कर्ष व विकासाचा ध्वज अंतरंगात धारण केला. मराठी विश्वातील सर्व दिग्गज सारस्वत सूर्योदयच्या व्यासपीठावर आणण्याचा चमत्कार या सळसळत्या चैतन्याने केला. युथ फोरम ते सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ या ३१ वर्षांच्या साहित्य सेवेने मराठी साहित्य विश्वात स्वतःचे एक आगळेवेगळे स्थान निर्माण. सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाची स्थापना केल्यावर एक नियम अखंड आहे राजकारणी सूर्योदयच्या व्यासपीठावर असणार नाही. फक्त साहित्यिकच या व्यासपीठावर येतील.
खानदेशातील हा तरूण श्री क्षेत्र नाशिक मध्ये परिवारासह आला खरा पण व्यवसाय सुरू केल्याबरोबर लॉकडाऊन सूरू झाले. उपजिविकेची परवड सुरू असतांना साहित्यसेवेचा बहर अखंड आहे. नाशिकमध्ये सूर्योदयची शाखा सुरू करून झपाटल्यागत काम सुरू केले. नवागत, उपेक्षित, धडपडणारे साहित्यप्रेमी, साहित्यिक जोडले. त्यांच्यातील साहित्य उर्जेला प्रवाही व प्रकाशित करण्यासाठी उपक्रम सुरू केले. गुगल मीटच्या माध्यमातून व्याख्याने, परिसंवाद, गझलसंमेलन, कवीसंमेलन, बालसाहित्यिक मेळावा, ऐतिहासिक, पौराणिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, अध्यात्मिक विचारमंथनाचे विविध उपक्रम करून बंदच्या काळात साहित्य उर्जा प्रवाही ठेवली, साहित्यिकांनाही कृतिशील ठेवलं.
अठरावे एकदिवशीय राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन रविवार २८ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार हा संकल्प व त्या दिशेने कृती दीड वर्षापुर्वीच सतीश जैनांनी सुरू केली. सहा सत्रात होणाऱ्या साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका सहा महिन्यापुर्वीच निश्चित केली. या माणसाची कल्पकता, दूरदर्शीपणा, संकल्पशक्ती, समयसूचकता व साहित्यनिष्ठा खरोखर अद्भूत आहे. स्वतःची आर्थिक स्थिती फाटकी. संस्थेजवळ छदाम नाही. सरकारी, निमसरकारी अनुदान नाही. राजकारण्यांचा आधार किंवा आश्रय नाही. सर्वसामान्यांच्या सक्रिय सहयोगाच्या सामर्थ्यावर हा ज्ञानयज्ञ, माऊली माय मराठीची, साहित्याची सेवा करण्याची तळमळ, धडपड, जिद्द खरोखर अनमोल. माऊली माय मराठीला अशी निर्मळ, नितळ, प्रामाणिक, समर्पित व पारदर्शी सेवा आवडते. त्याद्वारेच मराठी भाषेत प्राणवायू व प्राणशक्तीचा संचार होईल, प्रदूषण दूर होईल.
कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊन राजकारण व अर्थकारणात बुडालेल्या संमेलनात साहित्य कुठे आहे ?माऊली माय मराठी कुठे आहे ?नाव मातृभाषा माऊली मायमराठीचं अन् उद्योग मात्र स्वतःला मालामाल करण्याचे. हे सर्व काय चाललंय ?याला उत्तर देताहेत सतीश जैन. सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे जानेवारी २०२२ मध्ये अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन होणार आहे, सरकारी, निमसरकारी अनुदानाशिवाय, राजकारण्यांच्या आधार व आश्रयाशिवाय. केवळ जनसामान्य सुहृदांच्या सक्रिय सहयोगाच्या बळावर.
अमराठी तरूण साहित्य उर्जेने झपाटल्यामुळे मराठी साहित्य विश्वात किती उत्तुंग भरारी घेतोय. दुसरीकडे मायमराठीचं अन् साहित्याचं कुणालाच भान नाही. ईन्हेंट मॅनेजमेंट जोमात मराठी भाषा व साहित्य कोमात असं चित्र आहे. अखिल भारतीयाच्या उभारणीत, धामधुमीत रंगलेली, गुंतलेली मंडळी मराठी भाषा व साहित्याशी प्रामाणिक व समर्पित आहेत का?
रविवार २८ नोव्हेंबर २०२१ रोजी मानवधन विद्यानगरी, पाषाणपुष्प, पाथर्डीफाटा, श्रीक्षेत्र नाशिक इथं होणारं सूर्योदय साहित्य संमेलन हे मराठी भाषा व साहित्याला समर्पित आहे. जनसामान्यसुहृदांच्या सक्रिय सहयोगातून आविष्कृत होणार आहे. घोडा मैदान जवळ आहे. या व प्रत्यक्ष अनुभव घ्या.
पांडुरंग हरी वासुदेव हरी,
पांडुरंग हरी वासुदेव हरी,
सूर्योदयने घुमविली तुतारी,
२८ नोव्हेंबर रविवारी,
मानवधन विद्यानगरी,
बनणार साहित्यपंढरी,
साहित्य पंढरीचे वारकरी अन्
सारस्वतांकडून लाभेल शिदोरी.
मातृभाषा माऊली मायमराठीचा जयजयकार, नष्ट करील अज्ञान व अनाचाराचा अंधार.