सुरगाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उन्हाळ्याच्या सुटीच आजोळी आलेल्या दोन चिमुरडींचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. हातरुंडी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. आजोबा चिमणा भोये यांच्याकडे या दोन नाती आल्या होत्या. हातरुंडी गावाजवळील दरी या तलावात या दोघींचा अंत झाला आहे. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलीस पाटील मधुकर गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार, भावना भागवत गावित (वय ८, रा. सुभाषनगर डोल्हारे) आणि रेणुका परशराम भोये (वय ६ रा. सोनगीर, हल्ली मुक्काम हातरुंडी) अशी मृत चिमुरडींची नावे आहेत. या दोन्ही मुली सुट्टी निमित्ताने हातरुंडी येथे आजोबा चिमण भोये यांच्या कडे आल्या होत्या. सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान आजोबा समवेत त्या गावाजवळील दरी या तलावात रेड्यांना (हेले, दोबडांना) पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या.
रेड्यांना पाणी पाजून झाल्यावर त्यांना पाण्यातून बाहेर हुसकावत असतांना या दोन्ही पायात पडल्या. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोन्ही पाण्यात बुडाल्या. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यापैकी भावना ही जिल्हा परिषद शाळा डोल्हारे येथे दुसऱ्या इयत्तेत शिकत होती तर रेणुका ही सोनगीर येथे बालवाडीत होती.
नातेवाईकांनी हातरुंडी येथे धाव घेत मृतदेह ताब्यात घेत त्यांच्या राहत्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. यापुर्वीही तालुक्यात राशा, घागबारी येथे अशाच प्रकारे पाण्यात बुडून शाळकरी मुलींचा मृत्यू झाला होता.
Surgana Trible Girls Drown in Lake