सुरगाणा – फिर्यादीच निघाला चोर या घटनेचा प्रत्यय सुरगाणा तालुक्यात घडलेल्या घटनेवरुन आला आहे. या फिर्यादीची कसून तपासणी केली असता आपण स्वतःच दरोड्याचा बनाव केला असल्याची कबुली दिल्यानंतर पोलिस ठाण्यात त्याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास दिंडोरी न्यायालयात हजर केले असता त्याची नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. १३ जुलै रोजी हतगड किल्ला ते कनाशी रस्त्यावर गायदर घाटात फिर्यादी अभिजित भास्कर वाघ राहणार नाशिक यांनी सुरगाणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्याने अज्ञात चोरट्यांनी माझ्यावर घाटात हल्ला करून एक लाख सत्याहतर हजार रोख रक्कमेसह पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून घेत चोरट्यांनी चाकूने उजव्या हातावर वार केले असे म्हटले होते. त्याचप्रमाणे डोक्यावर वार करून हेल्मेटची तोंडफोड केल्याचेही त्यात नमुद केले होते. वाघ हा अवंति या खाजगी कंपनीसाठी दिंडोरी, वणी, कनाशी, अभोणा या भागात रक्कम गोळा करण्याचे काम करीत होता. पोलिस ठाण्यात तक्रारी नंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड यांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.
या दरोड्याची उकल करणे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले होते. मात्र फिर्यादीची कसून तपासणी केली असता आपण स्वतःच दरोड्याचा बनाव केला असल्याची कबुली दिल्यानंतर पोलिस ठाण्यात त्याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास दिंडोरी न्यायालयात हजर केले असता त्याची नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. फिर्यादीच चोर निघाल्याने कुंपनानेच शेत खाल्ले या म्हणीचा प्रत्यय आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे, सागर नांद्रे, पोलिस हवालदार पराग गोतुरणे,संतोष गवळी हे पुढील तपास करीत आहेत. सदर आरोपीची कसून चौकशी केली असता याआधी त्याने सिन्नर, वावी, उपनगर, कसारा रोड आदी ठिकाणी रस्त्यावर लूट केली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.