सुरगाणा – जोरदार पाऊस झाल्याने येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ गेली अनेक वर्षं उभा असलेला वडाचा डेरेदार वृक्ष उन्मळून मुख्य मार्गावर कोसळल्याने दोन ते तीन तास दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. रविवार रात्री पासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. आज सोमवारी देखील पाऊस सुरू राहिल्याने सुरगाणा – उंबरठाण या गुजरातला जोडणाऱ्या राज्य महामार्गावर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळील वडाचे झाड सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान उन्मळून रस्त्यावर पडले. सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही. याबाबत आपत्ती व्यवस्थापन कक्षात कळविण्यात आले. दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. गुजरातकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वाहनांना तसेच पळसन व उंबरठाणकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा खोळंबा झाला होता. महामार्गावर आडवे पडलेले मोठे वडाचे झाड कापण्यासाठी सुविधा नसल्याने हे झाड बांधकाम विभागाचे अभियंता मिचकुले यांनी जेसीबी उपलब्ध केल्याने जेसीबीच्या मदतीने एका बाजूला करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत सुरु करण्यात आली.