सुरगाणा – येथील होळी चौक ते अपना बेकरी दरम्यान कॅाक्रिट रस्त्याचे काम गेल्या पाच महिन्यांपासून रखडले असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन महाले यांच्या नेतृत्वाखाली याच रस्त्यावर भर पावसात उपोषण करण्यात आले.
मागील पाच सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम ज्या संथगतीने सुरू झाले होते त्यापेक्षा अधिक गतीने हे काम बंद पडले होते. पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही ह्या कॅाक्रिट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही. सुरुवातीला जे काही काम करण्यात आले ते इस्टीमेट प्रमाणे करण्यात आले नव्हते. शहरात जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने सदर रस्ता इस्टीमेट प्रमाणे व लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात होती. मात्र संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. या कारणास्तव २२ जून रोजी याच रस्त्यावर उपोषणाला बसण्याचा इशारा सचिन महाले यांनी दिला होता. यादरम्यान दोन दिवस आधी संध्याकाळी संबंधितांकडून जेसीबी लावून खडी पसरवून दाबण्यात आली. मात्र रस्ता पुर्ण कधी होणार याबाबत ठोस आश्वासन न मिळाल्याने आज सकाळी ११ वाजेपासून रस्त्यावर बसून आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष रमेश थोरात, नगरसेविका रंजना लहरे, डॉ. विनोद महाले, एन.डी. गावित, बाळकृष्ण सुर्यवंशी, कैलास सूर्यवंशी,
पुजा महाले, सुरेखा कातकाडे, आरती महाले, अंजली महाले, विमल महाले, विठ्ठल गावित, मनोहर जाधव, छोटू दवंडे, बप्पी महाले, पराग चौधरी, लव मेतकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारचे वेळी मुख्याधिकारी सचिन पटेल, ठेकेदार, अभियंता ताठे हे उपोषण स्थळी आले. यावेळी सचिन महाले यांनी नागरिकांच्या वतीने या कॉ॑क्रिट रस्ता संदर्भात स्पष्ट शब्दात बाजू मांडली. जोरदार पाऊस सुरू असूनही आंदोलन सुरू ठेवण्यात आले. यानंतर मुख्याधिकारी पटेल यांनी येत्या २२ तारखेपर्यंत हा कॉ॑क्रिट रस्ता पुर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पटेल यांच्या हस्ते पाणी पिऊन हे रस्त्यावरील आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र हा रस्ता पुर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा सचिन महाले यांनी दिला आहे. या आंदोलनाला माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. आंदोलन स्थळी तहसिलदार किशोर मराठे, पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे, पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
रस्त्यावर बसून आंदोलन सुरू असताना रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देताना भाजपचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन महाले. समवेत नगरसेवक व भाजप तालुकाध्यक्ष रमेश थोरात, डॉ. विनोद महाले, भावडू चौधरी, बाळकृष्ण सुर्यवंशी, दिनकर पिंगळे आदी.