अजय सोनवणे
नाशिकच्या सुरगाण्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू असलेल्या पळसन जवळील मेरदांड रस्ता डांबरीकरणाचे अंत्यत काम निकृष्ट दर्जाचे सुरु असून अक्षरशः हाताने रस्ता उखडला असल्याने तालुक्यात होणाऱ्या रस्ता कामाच्या दर्जा विषयी प्रश्न उपस्थित केले जात आहे. अंदाजीत १२७.२२ लक्ष रुपये किंमतीचे काम असून संबंधित ठेकेदाराने एका रात्रीत काम उरकत डांबराऐवजी आईल सदृश्य तेल वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावरील धुळ न झाडताच काम केल्याने डांबर रस्त्याला चिकटलेले नाही. त्यामुळे हा रस्ता हाताने उखडत असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व ठेकेदार यांच्या संगनमताने काम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आदिवासी बांधवांच्या पैश्याचा गैरवापर करणाऱ्या दोषींवर कारवाई करून दर्जेदार रस्ता बनविण्याची मागणी ग्रामास्थानी केली आहे.