सुरगाणा – येथील कोविड रुग्णालयाच्या पाठीमागे घाणीचे साम्राज्य पसरल्याने उपचार घेत असलेल्या रूग्णांसह आरोग्य कर्मचारींचे देखील आरोग्य धोक्यात आले आहे. मुलांचे शासकीय वसतिगृह कोविड सेंटर म्हणून असलेल्या येथील प्रशस्त इमारतीत सुरगाणा शहरासह तालुक्यातील पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचारासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र सद्यस्थितीत या कोविड सेंटर असलेल्या इमारतीच्या पाठीमागे मद्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ, प्लास्टिक आदी केरकचरा मोठ्या प्रमाणात साठला आहे. त्यामुळे रुग्ण, वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी आदींचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोविड रुग्णालय परिसर आतुन व बाहेरुन स्वच्छ ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या कोविड सेंटर मध्ये २२ हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच स्वॅब देण्यासाठी व टेस्ट रिपोर्ट घेण्यासाठी येथे येणाऱ्यांची वर्दळ असते. स्वच्छता कर्मचारी संख्या कमी असल्याने रुग्णालय व परिसराची नियमित स्वच्छता होत नसल्याचे समजते. सुरगाणा कोविड रुग्णालयाच्या मागील बाजूस मद्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक, ईतर कचरा यांचा पसारा वाढला आहे. यामुळे दुर्गंधी पसरुन रुग्णांचे व येथील कर्मचारींचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुळातच याठिकाणी असा कचरा साठलाच कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.