सुरगाणा – सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत गाळ साठल्याने हा गाळ काढण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.सुरगाणा शहराला येथील बनपाडा धरणाजवळ आमटी नदीच्या पात्रालगत नगरपंचातीची विहीर असून या विहिरीत साठलेल्या पाण्याचा एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. पाणीपुरवठा करणारी विहीर आणि टाकी यांच्यात अंदाजे दोन किलोमीटर अंतर आहे. तर टाकी जवळच जलशुद्धीकरण केंद्र आहे. सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या विहिरीत सद्यस्थितीत पाणी नसून गाळ साठल्याने पुढील काळात शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या विहिरीतील गाळ काढून ही विहीर व जलशुद्धीकरण केंद्र स्वच्छ करून येत्या पावसाळ्यात पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष भारत वाघमारे यांनी याठिकाणी पाहणी केली असून शहराला सुरळीत व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याचे म्हटले आहे.
पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य
१९९५ मध्ये युतीची सत्ता असताना जिल्ह्याचे तत्कालिन पालकमंत्री बबनराव घोलप यांनी मंजूर केलेल्या १ कोटी ११ लाख रुपयांच्या निधीतून सुरगाणा शहरासाठी नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती. या योजनेस २७ वर्षे पूर्ण झाली असून सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत गाळ मोठ्या प्रमाणात साठला आहे. त्यामुळे हा गाळ काढण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीस अनेक ठिकाणी गळती सुरू आहे. ही गळती बंद केली तरी तोच प्रकार पुन्हा घडत असल्याने पाणी वाया जाते. शहराची वाढती लोकसंख्या व गरज लक्षात घेता भविष्याच्या दृष्टीकोनातून नवीन नळपाणी योजनेसाठी पाठपुरावा सुरू असून शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. —
भारत वाघमारे – नगराध्यक्ष, सुरगाणा नगरपंचात.