सुरगाणा – येथून जवळच असलेल्या सुर्यगड गावाजवळील सुरगाणा – उंबरठाण रस्त्यावरील उतारावर आयशर व मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन मोटरसायकल वरील तिघे जण जागीच ठार झाले. यातील दोघे काका पुतणे आहेत. बुधवार दि.१ रोजी पाऊस सुरू असताना सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान सुरगाण्याकडून कोंबडींचे खाद्य घेऊन जाणाऱ्या आयशर क्र. एम एच १५ एफव्ही ०२४१ व सुरगाण्याकडे येणारी दुचाकी हिरो होंडा क्र. एम एच १५ बीएस ६६७५ यांच्यात झालेल्या या अपघातात घाटमाथ्यावरील खडकी (वांजुळपाडा) येथील तिघे जण जागीच ठार झाले. यात तेरा वर्षीय विद्यार्थ्याचा समावेश आहे. दुचाकी चालक गणेश भास्कर डंबाळे (२५), सोमनाथ बोवाजी पवार (४०) व अश्विन पंडित पवार (१३) सर्व राहणार खडकी (वांजुळपाडा) येथील असून या सर्वांच्या आकस्मित निधनाने गाव व परिसरात शोककळा पसरली आहे. सोमनाथ हे अश्विनचे काका होते. जोरदार धडक बसून रस्ता सोडून खालच्या बाजूने फरफटत नेलेल्या दुचाकीचा चक्काचूर झाला तर अश्विनचा देह छिन्नविछिन्न झाला. घटना स्थळावरून आयशर चालक फरार झाला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडखे हे करत आहेत. अपघात स्थळी मृतदेह उचलण्यास प्रभाकर महाले रा. भदर यांनी पोलिसांना मोलाचं सहकार्य केले. अश्विन हा अलंगुण येथील आश्रमशाळेत सातवीचे शिक्षण घेत होता. त्याची बहीण याच ठिकाणी शिक्षण घेत असून तिला जातीचा व उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी अश्विनचे काका अलंगुण येथे गेले होते. यावेळी अश्विनला बरं वाटत नसल्याने त्याला सोबत घेऊन दुचाकीने घरी जात असताना वाटेतच तिघांवरही काळाने घाला घातला. मयत गणेश डंबाळे यांना एक तीन वर्षांचा मुलगा असून त्यांच्या पत्नीचे चार पाच महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. गणेश यांचेही अशाप्रकारे अपघाती निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.