सुरगाणा – लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद बाबत निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर जीप घालून आठ शेतकऱ्यांना चिरडून ठार करण्यात आले. केंद्राकडून व भाजप शासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. न्याय्य मागण्यासाठी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांवर भाजपच्या मंत्री पुत्राकडून जीप घालून जीवे ठार मारण्यात आले. या घटनेने जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत सुरगाणा तालुका बंद ठेवण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळून सुरगाणा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने नायब तहसिलदार पवार यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित, शिवसेना तालुकाप्रमुख मोहनराव गांगुर्डे, राष्ट्रीय कॉ॑ग्रेसचे तालुकाध्यक्ष सखाराम भोये यांचेसह भरत वाघमारे, हरिभाऊ भोये, सुवर्णा गांगोडे, पोलीस निरीक्षक संदिप कोळी, सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलिप पवार, राजू पवार, सचिन आहेर, अर्जुन शिंदे, एकनाथ भोये आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उत्तरप्रदेश मधील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ सुरगाणा येथे महाविकास आघाडीच्या वतीने नायब तहसिलदार पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित, शिवसेना तालुकाप्रमुख मोहनराव गांगुर्डे, राष्ट्रीय कॉ॑ग्रेसचे तालुकाध्यक्ष सखाराम भोये. समवेत पोलीस निरीक्षक संदिप कोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलिप पवार व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते.